मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे आगळे वेगळे डॉक्टर


आपल्या समाजात अजूनही मुलगी आणि मुलगा यांच्यात भेद केला जातो. एखाद्या मातेला मुलगी झाल्यास तिला कशी वागणूक मिळते हे आपण पहातच असतो पण पुण्याचे डॉ. गणेश राख हे मुलीचा आणि तिच्या आईचा वेगळाच सन्मान करतात. हडपसर मध्ये त्यांंचे मेडिकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मुलगी झाली तर डॉ. राख तिच्या प्रसूतीचे बिल घेत नाहीत. एवढेच नाहीतर त्या रुग्णालयात डॉ. राख यांच्यासह सारे कर्मचारी मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करतात, केक कापतात आणि मिठाईही वाटतात. डॉ. राख हे अतीशय गरिबीतून वर आलेले आहेत. पण समाजात मुलीला मिळणारी वागणूक सहन न होऊन त्यांनी फार मोठी झळ सोसण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे.

डॉ. राख यांना त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात मोठी सन्मानाची वागणूक तर मिळाली आहेच पण महाराष्ट्रातल्या काही ग्रामपंचायतींनी त्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आपापल्या गावात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे निरनिराळे उपक्रम सुरू केले आहेत. त्यांनी अनेक डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनाही अशा उपक्रमाबाबत प्रोत्साहित केले असून राज्यातल्या आणि अन्य राज्यातल्याही सात हजार डॉक्टरांनी त्यांच्या प्रमाणेच आपल्याला शक्य होतील ते उपक्रम हाती घेतले असून आपण कधीच लिंगनिदान चाचणी करणार नाही असा निश्‍चय केला आहे. बीबीसी वर झालेल्या एका कार्यक्रमात महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी डॉ. राख यांचा उल्लेख रियल हीरो अशा शब्दात केला होता.

डॉ. राख यांच्या कार्याची दखल भारताबाहेरही घेतली गेली असून त्यांना आता कॅनडात इंडो कॅनडीयन असो. या संघटनेने त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी पाचारण केले आहे. पुण्यात आज सामान्य प्रसूतीसाठी किमान १० हजार रुपये आणि सिझेरीयन सेक्शन साठी किमान २५ ते ३० हजार रुपये बील घेतले जाते पण मुलगी जन्माला आल्यास डॉक्टर एवढाले बील माफ करतात. त्यामुळे रुग्णालयाच्या जमाखर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता असते पण डॉ. गणेश राख त्याबाबत फारशी काळजी करीत नाहीत. आपल्या मुलगी वाचवा मोहिमेमुळे होणार्‍या या तोट्याची भरपायी करण्यासाठी ते ओपीडीत जादा काम करायला तयार आहेत. त्यांना याबाबत त्यांचे सहकारीही पूणर्र् सहकार्य करतात. समाजात अनेक लोक मनाला दिलासा वाटावा अशी ही कामे करीत आहेत म्हणून हा समाज नीट चालला आहे.

Leave a Comment