भारताची मेडिकल टूरिझममध्ये झेप


भारतातले वैद्यकीय उपचार जगात सर्वात स्वस्त असूनही सर्वात चांगले आहेत त्यामुळे जगभरातले अनेक रुग्ण भारतात उपचारासाठी येतात. भारताच्या उपचारातील नैपुण्याची फार जाहीरात केली नसताना आणि उपचारावरील कमी खर्चाचा फार गवगवा केला नसतानाही भारतात मोठा व्यवसाय होतो. परदेशातून भारतात आलेल्या रुग्णाकडून आपल्याला दरसाल तीनशे कोटी डॉलर्स मिळतात. रुपयात ही रक्कम सांगायची तर ती होते साधारणत: १८ हजार कोटी रुपये. वास्तविक हा व्यवसाय भारतात फार वाढू शकतो असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करणारांनी असा अंदाज व्यक्त केला आही की हा व्यवसाय ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक होऊ शकतो.

किंबहुना तो २०२० सालपर्यंत तेवढा व्हावा या दिशेने सरकारने योजनाही आखली आहे. जगात मेडिकल टूरिझममधून साधारणत: सहा हजार कोटी डॉलर्सची उलाढाल होत असते. तिचा मोठा हिस्सा भारतातले डॉक्टर्स आपल्याकडे खेचू शकतात. भारतात आणखी एक टूरिझम वाढत आहे ते आहे कॉस्मेटिक टूरिझम. सौंदर्यासाठी काही महिला शस्त्रक्रिया करून घेतात. कोणाला आपल्या नाकाची जाडी किंवा लांबी वाढवायची असते तर कोणाला चेहर्‍यावरच्या काही सुरकुत्यांवर प्लॅस्टिक सर्जरी करून घेऊन वार्धक्य लपवायचे असते. हे उपचार अमेरिकेत एक लाख डॉलर्सला होत असतील तर तेच उपचार भारतात दोन ते तीन हजार डॉलर्समध्ये होतात. त्यामुळे पैशाची बचत होते.

हेच पैसे खर्चूून भारतातली काही पर्यटन स्थळे पाहून हा रुग्ण परत आपल्या देशाला जातो. म्हणजे पर्यटनही होते आणि उपचारही होतात. काही रुग्णांना भारतात येऊन खास आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतात. ते भारताशिवाय इतरत्र कोठेच होत नाहीत. पंचकर्म सारखे आयुर्वेदिक उपचार केवळ भारतातच होतात. केरळात अशा क्लिनिक्सनी परदेशातल्या अनेक रुग्णांना या उपचारासाठी आकृष्ट केले आहे. महाराष्ट्रातही अशा उपचारांची सोय आहे. भारतातले डॉक्टर्स हे कोणत्याही देशातल्या उत्तम डॉक्टरांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळेही भारताकडे येणारांची मोठी रीघ लागू शकते. सध्या अरबस्तान, पाकिस्तान आणि यूरोपातल्या अनेक देशांतले रुग्ण भारतात येत असतात. त्यातून भारतातल्या डॉक्टरांचा तर व्यवसाय वाढणार आहेच पण, भारतातल्या पर्यटनालाही गती मिळणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment