ई-कॉमर्समध्ये ४५ टक्के वाढ


दिवाळीत मंदी आहे असा आरडाओरडा करणारांना दिवाळीच्या काही दिवसांत दुकानात गर्दी दिसली नसल्याने आरडा ओरडा करायला थोडा जोर आला पण अर्थतज्ज्ञांनी आता बाजाराचे विश्‍लेषण करून हे दाखवून दिले आहे की आता बाजारात मंदी आहे की तेजी हे ठरवण्यासाठी दुकानांतली गर्दी हा एकमेव निकष वापरता कामा नये. कारण दुकानात न जाताही मोठी खरेदी करणारा, इ कॉमर्सच्या मार्गाने खरेदी करणारा एक वर्ग समाजात निर्माण झाला आहे आणि तो आता वाढत आहे. या वेळी तर अशा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर ऑन लाईन खरेदी केली आहे. त्यामुळे तेजी असूनही ती बाजारात आणि दुकानात दिसलेली नाही.

२० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर हा दिवाळीच्या खरेदीचा महिना म्हणून गृहित धरून या काळात किती उलाढाल झाली याचा अंदाज काढला असता असे लक्षात आले की, या महिनाभरात भारतातल्या विभिन्न भागातल्या ग्राहकांनी १९ हजार कोटी रुपयांची खरेदी केली आहे. ऑन लाईन खरेदी करणारांची गर्दी वाढत आहे हे खरे पण त्यांची या वर्षीची खरेदी एवढी होईल असा कोणाला भरवसा नव्हता. २०१६ सालच्या दिवाळीच्या एका महिन्यातली ऑन लाईन खरेदी १४ हजार ३०० कोटी रुपयांची होती. यंदा मंदी असती तर ही खरेदी यंदा १४ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी झाली असती पण यंदा ही खरेदी १९ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यंदा झालेल्या या खरेदीत झालेली ही वाढ ४५ टक्क्यांनी जास्त आहे. हे काय मंदीचे लक्षण आहे काय?

ऑन लाईन खरेदीत काही सोयी आहेत. एकतर भारतातल्या कोणत्याही लहान शहरांत राहणार्‍या लोकांना कोणतीही खऱेदी करताना आपल्या गावात त्या वस्तूच्या व्हरायटीज पहायला मिळत नाहीत पण ऑन लाईन खरेदी करणारांना एकाच वेळी घरात बसून त्या वस्तूचे अनेक नमुने पहायला मिळतात. अनेक प्रकार पहायला मिळणे हे या खरेदीचे वैशिष्ट्य आहे. शिवाय आपल्याला हवी असेल ती वस्तू आपण घरात बसून मागवू शकतो आणि ऑन लाईन खरेदीत अनेक सवलती मिळतात. आपण मागवलेली वस्तू घर चालून येते आणि आपल्याला ती नको असेल तर बदलूनही मिळते. ग्राहकाची सर्वात छान सोय असते ती अनेक नमुने पहायला मिळणे, किंमतीत सूट मिळणे आणि खरेदीसाठी बाहेर पडण्याची गरज नसणे. या तिन्ही सोयी या व्यापारात होतात म्हणून हा प्रकार वेगाने वाढत आहे. खरेदीसाठी दुकानात जाण्याची रीत आता जुनी होत आहे.

Leave a Comment