शाकाहारप्रेमी देश


सुट्टीमध्ये फिरायला परदेशामध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे तेथील खानपानाचा. प्रत्येक देशाच्या खानपानाच्या पद्धती, परंपरा, पदार्थ वेगवेगळे असतात. त्यातून मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थ खाऊ शकतात, पण परदेशामध्ये खाण्या पिण्याचे हाल होतात ते शाकाहारी लोकांचे. आजकाल परदेशामध्ये देखील शाकाहार मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात असला, तरी ते पदार्थ बनविताना वापरले गेलेले साहित्य परिचयाचे नसले, की पदार्थ खावा किंवा न खावा असा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

त्यातून ज्या देशांमध्ये मूळचे भारतीय असणारे लोक स्थायिक झाले आहेत, त्या देशांमध्ये भारतीय पद्धतीचे शाकाहारी जेवण सहज उपलब्ध होऊ शकते. उदाहरणार्थ सिंगापूर सारख्या देशांमध्ये भारतीय लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहेत, की येथे थेट भारतीय पध्दतीचे, चवीचे जेवण माफक किमतीमध्ये सहज उपलब्ध होते.

त्या त्या देशामधील जनसंख्या लक्षात घेऊन शाकाहारी अन्नपदार्थ देणारी रेस्टॉरंट्स, त्या देशामधील जनसंख्येचे एका वर्षामधील मांसाहारसेवानाचे प्रमाण, इत्यादी निकष लक्षात घेऊन, ‘ऑलीव्हर्स ट्रॅव्हल्स’ नावाच्या वेबसाईट ने सेशेल्स हा सर्वाधिक शाकाहाराचा स्वीकार केलेला देश असल्याचे घोषित केले आहे. या देशामध्ये मांसाहाराचे प्रमाण अगदी कमी असून, मुख्यतः तांदूळ, नारळ, आंबे, रताळी इत्यादी पदार्थांचा येथील नागरिकांच्या खानपानामध्ये जास्त समावेश असतो. या देशामध्ये व्यक्तीमागे दरवर्षी ३५ किलो मांसाचे सेवन केले जाते. हेच प्रमाण अमेरिकेसारख्या देशामध्ये माणशी १२० किलो इतके आहे. पण अमेरिकेमध्ये माणशी मांसाहाराचे प्रमाण जास्त असले तरी येथे शाकाहारी रेस्टॉरंट्स ची संख्या ही सर्वाधिक आहे.

सेशेल्स च्या पाठोपाठ थायलंड, मलेशिया, पेरू, सिंगापूर, कंबोडिया, सोलोमन आयलंड्स, इंग्लंड आणि बोट्स्वाना हे देश शाकाहार प्रेमी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment