गरमागरम कॉफीसोबत आवडती पुस्तके वाचण्यासाठी ‘ बुक कॅफेज् ‘


सध्याच्या काळामध्ये ‘ बुक कॅफे ‘ ही संकल्पना, वाचनाची आवड असणाऱ्या पुस्तकप्रेमींच्या पसंतीला उतरत आहे. आपल्या आवडत्या लेखकांची सगळीच पुस्तके आपल्याला विकत घेता येतातच असे नाही. एक तर ती विकत घेऊन ठेवायची कुठे ही सगळ्यात मोठी अडचण असते. शिवाय एकदा , दोनदा वाचून झाल्यांनतर त्या पुस्तकाचे करायचे काय हा ही प्रश्नच असतो. याला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे वाचनालय. पण वाचनालयात बसून पुस्तके चाळत असताना, त्याच्या जोडीला गरमागरम कॉफी आणि तोंडात टाकण्यासाठी काही चटपटीत खाद्यपदार्थ सुद्धा मिळाले तर? ‘ बुक कॅफे ‘ ची सुद्धा हीच संकल्पना आहे. इथे निवांतपणे बसून आपल्या आवडत्या पुस्तकांच्या संगतीत रमत, गरमागरम कॉफी पिण्याची कल्पना वाचनप्रेमींना चांगलीच पसंत पडली आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी ‘ बुक कॅफे ‘ अवतरले.

बेंगळूरू शहरामधील कोरमंगला भागामध्ये ‘ अॅटा गलाटा ‘नावचे बुक कॅफे आहे. आधी या बुक कॅफेमध्ये केवळ स्थानिक भाषेमधील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होती. पण आता तेलगु, मलयालम, हिंदी, इंग्रजी आणि इतरही अनेक भाषांमधील हजारो पुस्तके इथे उपलब्ध आहेत. इथे मिळणारा मसाला ब्रेड आणि फ्रुट ब्रेड ही प्रसिद्ध आहे. मुंबईमधील अंधेरी पश्चिम भागामध्ये असणारे ‘ लीपिंग विंडोज ‘ हे बुक कॅफे विनोदी साहित्याकरिता प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला विनोदी साहित्याची आवड असेल, तर या बुक कॅफेला जरूर भेट द्यायला हवी. सर्व वयोगटाच्या वाचक वर्गांकरिता येथे पुस्तके उपलब्ध आहेत. व्हियेतनामीज आईस्ड कॉफी या बुक कॅफे ची खासियत आहे.

‘ कॅफे टर्टल ‘ हे दिल्लीमधील खान मार्केट या भागातील बुक कॅफे आहे. येथे निवांत बसून आपल्या आवडीचे पुस्तक तासंतास वाचण्याची पुस्तकप्रेमींना मुभा आहे. या बुक कॅफे मध्ये अनेक उत्तम पुस्तकांच्या शिवाय अनेक उत्तम खाद्यपदार्थ देखील उपलब्ध आहेत. येथील लेमन चीज केक वाचनप्रेमींच्या आवडीचा आहे. मुंबईमधील फोर्ट भागामध्ये असलेले ‘ किताब खाना ‘ हे बुक कॅफे, त्यामध्ये असलेल्या सध्या गाजत असलेल्या पुस्तकांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. येथे हर तऱ्हेची पुस्तके वाचकांना वाचायला मिळतात.

पुणे शहरातील बाणेर पाषाण लिंक रोड भागामध्ये असलेले ‘ पगदंडी ‘ हे बुक कॅफे देखील नेहमीच वाचनप्रेमींनी गजबजलेले असते. येथेही सर्व प्रकारची पुस्तके पाहायला, वाचयला मिळतात. त्याच्या जोडीने चटपटीत खाद्यपदार्थ मिळण्याची सोय ही पगदंडी मध्ये आहे. हैदेराबाद येथे असलेले ‘ द कॉफी कप ‘ ह्या बुक कॅफे मध्ये पुस्तक वाचनाच्या जोडीने काही बोर्ड गेम्स खेळण्याचीही सुविधा आहे. हे कॅफे अतिशय सुंदर सजावट केलेले असून, या कॅफेला एक सुंदर गच्ची देखील आहे. येथे निवांत बसून वाचक आपल्या आवडत्या पुस्तकांच्या संगतीत वेळ घालवू शकतात.

Leave a Comment