संकट हीच संधी


मायकेल जॉर्डनच्या या कथेने त्याला बरेच काही शिकवले. एक डॉलरचा कपडा दोन रुपयांना विकला जात नसतो पण त्याने तसा प्रयत्न केला आणि दोनच नाही तर ३०० डॉलर्सला विकला. त्याला तसे करण्यावाचून काही पर्यायच नव्हता. कपडा विकून पैसे आणले नसते तर उपाशी रहावे लागले असते. तो संकटात होता म्हणून त्याने आपल्या कल्पना शक्तीला ताण दिला आणि त्यामुळे त्याला मार्ग सापडला. तो संकटात नसता तर त्याने आपल्या कल्पना शक्तीला एवढा ताण दिला नसता. तसा ताण देऊन तो कपडा तीनशे पटीला विकून दाखवण्याची क्षमता त्याच्या मेंदूत होती पण त्याच्यावर संकट आले म्हणून ती क्षमता प्रकट झाली. संकटात माणसाची क्षमता प्रकट होते.

ही गोष्ट आपल्याला संकटाकडे कसे पहावे हे शिकवते. आपण संकटे वाईट असतात असे मानतो. कोणालाही संकट, आव्हाने आणि प्रतिकूल स्थिती नकाशी वाटत असते पण काही लोक अशा संकटात संधी शोधतात. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे. देअर इज वन अपॉर्च्यनिटी इन एव्हरी डिफिकल्टी. खरे तर जीवन म्हटल्यावर चांगल्या आणि वाईट अशा सगळ्याच प्रसंगातून जावे लागते. पण त्यातल्या वाईट प्रसंगांनी घाबरून न जाता त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या सगळ्या क्षमतांचा कमालीचा वापर करावा. त्यातून संकटातून सुटका होतेच असे नाही काही वेळा होतही नाही पण त्या निमित्ताने आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा आपल्यालाच साक्षात्कार होतो. शोध लागतो.

आपण एखाद्या जंगलातून चाललो आहोत असे समजा. अचानकपणे समोरून वाघ येतो आणि आपल्यामागे लागतो. आपण पुढे आणि वाघ मागे अशी शर्यत सुरू होते. त्याला आपला घास करायचा आहे आणि आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे. समोर एक विहीर दिसते. पाण्याने तुडुंब भरलेली असते. आपण तिच्यात उडी घेतो. आपल्याला ही युक्ती सुचते कारण आपण आपल्या सार्‍या कल्पना शक्तीला कामाला लावलेले असते. आपल्यावर हे संकट आले नसते तर आपण असे आपल्या कल्पना शक्तीला कामाला लावले नसते. त्यातून आपल्याला असा बोध झाला की, आपण प्रयत्न केला तर आणि वेळ पडली तर आपला जीव युक्तीने वाचवू शकतो. यातून अजून एक काम होते ते म्हणजे आपल्यावर संकट आले तर आपण आपण त्यातूून तगून जाऊ शकतो अशी सकारात्मक भावना आपल्या मनात जागी होते. संकट आले म्हणून घाबरून जाण्याचे काही कारण नाही असा धडा आपल्याला मिळतो. तो जन्मभर आपल्याला संकटांशी झगडायला शिकवतो.
( क्रमश:)

Leave a Comment