मुद्रांक घोटाळ्याचा बादशहा अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू


देशभरात अब्जावधी रूपयांचा मुद्रांक शुल्क घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी याचा गुरूवारी बंगलोर येथील रूग्णालयात मृत्यू झाला. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती व त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले गेले होते. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, एडससह अनेक व्याधी होत्या व तो मेंदू ज्वरावरील उपचारांसाठी रूग्णालयात होता.

२००१ साली तेलगीला अजमेर येथून बनावट मुद्रांक शुल्क प्रकरणात अटक केली गेली होती व २००७ साली त्यात तो दोषी ठरून त्याला ३० वर्षे सक्तमजुरी व २०२ कोटी रूपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली होती. तो बंगलोर येथील पाराप्पमा अग्रहार तुरूंगात शिक्षा भोगत होता. पोलिस तपासात त्याच्या नावावर १८ शहरात १२३ बँक खाती असल्याचे उघडकीस आले होते.

कर्नाटकच्या खानपूर रेल्वे स्टेशनवर व्हेंडरचा व्यवसाय करणार्‍या तेलगीने १९९३ ते २००२ या काळात बनावट स्टँप बनवून अब्जावधी रूपयांचा सरकारी महसूल बुडविला होता. हे बनावट स्टँप तो मोठा डिस्काऊंट देऊन विकत असे. देशभर त्याचे एजंट होते व कमिशनवर ते हे स्टँप विकत असत. त्याच्या या बेकायदा व्यवहारात अनेक राजकीय नेते, पोलिस अधिकारी यांचीही नांवे समोर आली होती. तेलगीवर ११ राज्यात ४० केसेस दाखल होत्या. त्याच्या नावावर ३६ मालमत्ता होत्या. बनावट स्टँप प्रिंट करून तो बँका, विमा कंपन्या व स्टॉक ब्रोकर्सना विकत असे.

Leave a Comment