रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश


रियाध – जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.

रोबोटला नागरिकत्व देण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. सोफियाला नागरिकत्व रियाध येथे बुधवारी एका परिषदेत बहाल करण्यात आले. नागरिकत्व मिळाल्यानंतर तिचा इंटरव्ह्यू देखील घेण्यात आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नागरिकत्व मिळणे हा माझा सन्मान असून मानवांना समजून घेऊन मला त्यांचा विश्वास संपादन करायचा असल्याचे खुद्द या सोफिया नावाच्या रोबोटने म्हटले आहे. देशाचे नागरिकत्व मिळवून जगातील पहिली रोबोट बनणे हे माझ्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सोफिया पुढे म्हणाली. सोफियाने नागरिकत्व मिळाल्यानंतर या इंटरव्ह्यूमध्ये जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाईल कंपनीचे मालक अॅलन मस्क आणि हॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केले.

कृत्रिम बुद्धिमतेमुळे मनुष्यांच्या रोजगारावर गदा येईल असे काही दिवसांपूर्वी मास्कने म्हटले होते. माझी कृत्रिम बुद्धिमत्ता मी वापरू इच्छिते जेणेकरून मानवांना चांगले जीवन जगता येईल, मी स्मार्ट डिझाईन बनविणे, भविष्यातील चांगली शहरे तयार करणे जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन, असेही तिने म्हटले.

Leave a Comment