मूळचे भारतीय असणाऱ्या जोडप्याचा अमेरिकेमध्ये पुरस्कार देऊन सन्मान


एचआयव्ही आणि एड्सच्या क्षेत्रामध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल मूळचे भारतीय असणाऱ्या पण आता साऊथ आफ्रिकेमध्ये असणाऱ्या सलीम अब्दुल करीम आणि करायशा अब्दुल करीम या दाम्पत्याचा अमेरिकेतील बाल्टीमोर येथील ‘ इस्टीट्युट ऑफ ह्युमन व्हायरोलॉजी ‘ या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. एड्स पासून बचाव आणि एड्स वरील उपचारपद्धती या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल करीम दाम्पत्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन बायोमेडीकल संशोधक रॉबर्ट गॅलो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एड्स रोगाकरीता एचआयव्ही हा व्हायरस जबाबदार असल्याचा महत्वपूर्ण शोध गॅलो यांनी लावला होता.

करीम दाम्पत्य संसर्गजन्य रोग तज्ञ असून एचआयव्ही च्या संसर्गाबद्दल आणि तसा संसर्ग झालाच तर त्यासाठी कोणती उपचारपद्धती लागू करता येईल या बद्दल विशेष त्यांनी अभ्यास केला आहे. सलीम अब्दुल करीम हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून, जागतिक आरोग्य ( ग्लोबल हेल्थ ) हा त्यांचा विषय आहे. साऊथ आफ्रिकेतील सेंटर फॉर एड्स प्रोग्रॅम ऑफ रिसर्च ईन साऊथ आफ्रिका (CAPRISA) ह्या संस्थेचे निर्देशक म्हणूनही सलीम काम पाहतात. त्याचबरोबर इतरही अनेक शैक्षणिक आणि संशोधन प्रबोधीनींमध्ये सलीम काम करतात. त्यांच्या पत्नी कारायशा ह्या डॉक्टरेट असून, त्या ही CAPRISA मध्ये काम करतात. साऊथ आफ्रिकेमध्ये एड्सचा प्रादुर्भाव नक्की कसा सुरु झाला याबद्दल करायशा यांनी अभ्यास केला आहे. तसेच तरुण मुलींना एड्स होण्यामागे कोणती कारणे आहेत व त्याच्या उपचारपद्धती विषयी ही त्यांनी अभ्यास व संशोधन केले आहे. सलीम आणि करायशा हे दाम्पत्य स्त्रियांमध्ये एचआयव्ही चा संसर्ग कसा रोखता येईल या करिता सतत प्रयत्नशील असतात.

या दाम्पत्याच्या अथक प्रयत्नांमुळे ‘ CAPRISA 004 TENOFOVIR GEL ‘ या औषधाचा शोध लागला. शारिरिक संबंधांमुळे उद्भविणारे एड्स आणि हर्पीस टाईप २ सारख्या आजारांवर हे औषध आहे. २०१० साली या औषधाची पहिल्यांदा यशस्वी चाचणी करण्यात आली. त्या वर्षीच्या सर्वात उल्लेखनीय वैद्यकीय शोधांच्या यादीत करीम दाम्पत्याने शोधलेल्या औषधाचाही समावेश होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment