सस्पेंस,थ्रिलर या बाजाचा ‘फास्टर फेणे’


लेखक भा. रा. भागवत यांनी ८०च्या दशकात ‘फास्टर फेणे’ या अवलियाला वाचकांसमोर आणले. आता २१ व्या शतकात तितक्याच ताकदीने लहानग्यांचे विश्व व्यापून टाकणारा ‘फेणे’ रूपेरी पडद्यावर आणण्याचे काम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, पटकथाकार क्षितिज पटवर्धन आणि अभिनेता अमेय वाघ या त्रिकुटाने यशस्वीपणे केले आहे. प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यात सस्पेंस, थ्रिलर या बाजाचा ‘फास्टर फेणे’ यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाचा युएसपी ‘वेग’ हा आहे. प्रेक्षकांना सुमारे दोन ते सव्वा दोन तास चित्रपटामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक आणि ड्रोनच्या मदतीने टिपलेले काही सीन्स बाजी मारून जातात.

अतिशय हुशार, चपळ कॉलेजवयीन मुलगा आहे बनेश फेणे (अमेय वाघ). बनेश पुण्यामध्ये मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी आलेला असतो. त्याची धनेश या मुलाशी परिक्षेपूर्वी काही वेळ आधी भेट होते. त्याला परतीच्या वाटेवर असताना परिक्षेआधी भेटलेल्या या उमद्या तरूणाने आत्महत्या केल्याचे वर्तमानपत्रातील बातमीतून कळते. परिक्षेआधी भेटलेला एक हुशार उमदा तरूण आत्महत्या करूच शकत नाही, असे बनेशला वाटते. त्याच्या मृत्यूची उकल करण्यास फेणेला भाग पाडतो. या कामामध्ये त्याची बालपणीची मैत्रिण आणि पत्रकार अबोली ( पर्ण पेठे), आजोबा / भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर ) आणि भू भू ( शुभम मोरे) मदत फास्टर फेणेला करतात. जसजसा तपास करतो तसतशी फास्टर फेणेला अनेक रहस्यांचा उलगडा होत जातो. दरम्यान हा केवळ खून नसून शिक्षणव्यवस्थेतील एक मोठा घोटाळा असल्याचे लक्षात येते. ‘आप्पा’ ( गिरीश कुलकर्णी) या घोटाळ्यामागचा मुख्य सूत्रधार असतो.

फास्टर फेणेसाठी पैसा, सत्ता यांमुळे उद्दाम झालेला ‘आप्पा’ चक्रव्युह रचतो. पण फास्टर फेणे हे चक्रव्यूह केवळ चलाखीच्या जोरावर भेदून ‘आप्पा’चा खेळ कसा खल्लास करतो. त्याची खरी मज्जा पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरच गाठावे लागेल.

अगदीच अवघड आणि क्वचित निवडला जाणारा प्रकार म्हणजे ‘सस्पेन्स थ्रिलर’. रसिक म्हणून त्यामुळे तुम्हांला हा विषय आवडत असेल तर ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट मुळीच मिस करू नका. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणे नाही, त्याचबरोबर आगाऊ स्टंटबाजी नाही. तरीही प्रेक्षक म्हणून तुमच्याही मेंदूला चित्रपट पाहताना चालना देणारा हा चित्रपट मराठी चित्रपटातील एक यशस्वी प्रयत्न नक्की म्हणता येईल.