बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरण्याचा अद्भुत विश्वविक्रम


आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्रात होत असलेली प्रगती, क्रीडाक्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक पातळीवर मिळणारे भरघोस यश, यामध्ये भारतीय नागरिक पुढे आहेतच, पण त्याशिवाय भारतामध्ये अजब गजब विश्वविक्रम करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. ‘ जगातील सर्वात मोठी पोळी ‘, किंवा जास्तीत जास्त वेळ टूथब्रश वर बास्केटबॉल ठेऊन फिरविणे’, असले विश्व विक्रम भारतातील विक्रमवीरांनी केलेले आहेत. अद्भुत, अजब विश्वविक्रमांमध्ये अजून एका विश्वविक्रमाची भर पडली असल्याचे वृत्त ‘ स्टोरीपिक ‘ या वेबसाईटद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई येथील दिनेश शिवनाथ उपाध्याय यांनी बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरून नवा विश्वविक्रम करीत ‘गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदविले आहे. दिनेश हे व्यवसायाने शिक्षक असून, त्यांनी या पूर्वीही आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदविले आहेत. त्याच्या ‘ट्वीटर बायो’ वर असलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी केलेल्या ८९ विक्रमांची गिनीस बुकमध्ये नोंद असून, ५७ विक्रमांची ‘ लिम्का ‘ रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. तसेच त्यांनी केलेल्या तीन विक्रमांची नोंद ‘ रीप्लीज ‘ मध्येही आहे. एका मिनिटामध्ये ७३ द्राक्षे खाण्याचा विक्रम दिनेश यांच्या नावावर असून, डोळे बांधून हातांच्या ओंजळीमध्ये फासे अचूकपणे झेलण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी डोळे बांधून तीस सेकंदांच्या अवधीत ४३ फासे अचूक झेलण्याचा विक्रम केला आहे.

Leave a Comment