गरम कपड्यांसाठीचे स्वस्त व रास्त बाजार


परतीच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता हळूहळू वातावणात मांजरीच्या पावलांनी थंडी उतरू लागली आहे. पहाट आता अधिक गार होते आहे अशा वेळी थंडीसाठी उबदार कपड्यांची खरेदी व्हायलाच हवी. लहान मुले, म्हातारे थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांचा वापर आता अधिक करू लागतील तर युवा ब्रिगेट थंडीपासून संरक्षणाबरोबरच फॅशनसाठी उबदार कपड्यांना पसंती देतील. अशा वेळी ही खरेदी कुठून केली तर ती जास्त स्वस्तात व रास्त दरात होते याची ही माहिती


चांदणी चौक ही जुन्या दिल्लीतील बाजारपेठ अशा उबदार कपड्यांचे माहेरघर म्हणता येईल. येथे स्वेटर्स, शाली, जॅकेटस, कानटोप्या, मफलर, कोट, सॉक्स, ग्लोव्हज अशी विविध कपडे विकणारी दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच येथे बर्‍याच ठिकाणी हा माल तयारही केला जातो. देशाच्या अनेक भागात येथूनच गरम कपड्यांचा पुरवठा केला जातो. उत्तर भारताच्या अनेक राज्यातून येथे माल येत असतो. वेगवेगळ्या कपड्यांसाठी येथे छोटे छोटे बाजार आहेत व तेथे आपल्या नेहमीच्या दुकानांपेक्षा ४० ते ५० टक्के किमतीत ही खरेदी करता येते.


दिल्लीच्याच पूर्व भागातील शहादरा रोहताश नगर मार्केटमध्ये लहान मुले व महिलांचे होलसेल मार्केट आहे. येथेही वुलन कपडे अत्यंत स्वस्तात व चांगल्या दर्जाचे मिळतात.


पंजाबचे लुधियाना शहर गरम कपडे उत्पादनासाठी तसेच लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. येथील घुमर मंडी मार्केट व करीमपुरा बाजार येथे गेल्याशिवाय गरम कपड्यांची खरेदी पूर्ण होऊच शकत नाही. येथे किमान १ हजार दुकाने आहेत. तेथे गरम कपड्यांबरोबच साडी, पार्टीवेअर, सूट, जिन्स, टीशर्ट असे कपडेही मिळतात. येथेही रिटेलपेक्षा निम्म्या दरात ही खरेदी करता येते.


लखनौतील अमीनाबाद हे अतिशय जुने मार्केट वुलन कपड्यांबरोबरच आर्टिफिशियल ज्वेलरीसाठीही प्रसिद्ध आहे. अर्थात येथे खरेदी करताना बार्गेनिंगची कला अवगत असेल तर येथील खरेदी स्वस्तात आणि मस्त होऊ शकेल.


जयपूर मधील जौहरी बाजार हा खरा ज्वेलरी बाजार. निमुळत्या अरूंद गल्या असलेल्या या बाजारात ग्राहकांची सतत गर्दी असते. हा बाजार अनेक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. वुलन कपडे, राजस्थानी जोडे, कुंदन ज्वेलरी येथे ४० टक्कयांपर्यंत कमी किमतीत मिळू शकते.

Leave a Comment