आता इन्स्टाग्राम युजर्सदेखील करू शकणार कॉन्फरन्स लाईव्ह स्ट्रीमिंग


नवी दिल्ली – आपल्या मित्रांसह लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे नाविन्यपूर्ण फिचर इन्स्टाग्रामने युजर्सला प्रदान केले असून एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून इन्स्टाग्रामने आपल्या या नवीन फिचरबाबत माहिती दिली आहे. त्या पोस्टनुसार आता लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतांना आपल्या मित्रांना इन्स्टाग्रामचा वापर करणार्‍या युजर्सला यात समाविष्ट करता येणार आहे.

लाईव्ह असताना कुणीही ते पाहणार्‍या मित्राला अ‍ॅड या बटनावर क्लिक करून यात सहभागी करू शकतात. स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर यामुळे पिक्चर-इन-पिक्चर या पध्दतीने संबंधीत युजर आणि त्याचा मित्र एकमेकांना पाहू शकतील. ते इतरांनाही दिसेल. लाईव्ह असणारा व्यक्ती यात वरील बाजूस तर समोरचा युजर खालील बाजूस दिसेल. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला हे फिचर वापरणारा युजर कोणत्याही क्षणी लाईव्ह स्ट्रीमिंगमधून काढू शकतो. आणि नवीन युजरला तो अ‍ॅडदेखील करू शकतो. या सर्व लाईव्ह व्हिडीओवर अन्य युजर्स लाईक/कॉमेंट करू शकतात.

संबंधीत युजर हा लाईव्ह व्हिडीओ संपल्यानंतर आपल्या स्टोअरीजवर (२४ तासांसाठी) वापरू शकतो. अन्यथा तातडीने हा व्हिडीओ नष्टदेखील करता येतो. लाईव्ह स्ट्रीमिंग करणार्‍या युजर्सच्या स्टोरीज बारमधील गोलाकार चित्रासमोर दोन डॉट दिसतील. यावर कुणीही क्लिक केल्यावर ते स्ट्रीमिंग पाहून त्यावर कॉमेंट करू शकतो.

Leave a Comment