‘ द ग्रेट वॉल ऑफ चायना ‘ नंतर भारतात जगातील दुसरी सर्वात मोठी तटबंदी


‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही सर्वांनाच जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ज्ञात आहे. पण चायना वॉलच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब तटबंदी ( भिंत ) भारतामध्ये आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. या तटबंदीला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असे ही म्हटले जाते. ही महाकाय तटबंदी आहे राजस्थानमधील उदयपूर जवळ असलेल्या कुंभलगड या किल्ल्यावर. अकराशे फुटांच्या कुंभलगड किल्ल्याच्या भोवताली बांधलेल्या या तटबंदीचा विस्तार सुमारे ३६ किलोमिटर पर्यंत पसरलेला असून ह्या भिंतीची रुंदी पंधरा फुटांची आहे. या तटबंदीवर एकाच वेळी दहा घोडे दौडू शकतात इतकी ही तटबंदी लांब-रुंद, अजस्त्र आहे.

कुंभलगडाचा हा किल्ला महाराणा कुंभ यांनी बनवविला. या किल्ल्याच्या घडणीकरिता पंधरा वर्षांचा अवधी लागला. या किल्ल्याच्या निर्माणकार्याला १४४३ साली सुरुवात होऊन, १४५८ साली हे निर्माणकार्य पूर्ण झाले. ह्या किल्ल्याला सात विशालकाय दरवाजे असून, बळकट बुरुज या किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आले होते. या किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागामध्ये ‘बादल महाल’ आणि ‘कुंभ महाल’ या दोन निवासी वास्तू आहेत. वीर पृथ्वीराज आणि राणा सांगा यांचे बालपण याच किल्ल्यावर गेले. पन्ना दाई ने महाराणा उदय सिंह यांचे पालनपोषण याच किल्ल्यावर गुप्तपणे केले होते. हल्दीघाटीचे युद्ध सुरु असताना महाराणा प्रताप यांचे याच किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते.

१४४३ साली राणा कुम्भाने कुंभलगडावरील विशालकाय तटबंदीच्या निर्माणकार्यास सुरुवात करविली. त्याकाळची एक मोठी रोचक कथा आजही या परिसरात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की या तटबंदीचे निर्माणकार्य राणा कुम्भाने सुरु करविले खरे, पण या कार्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येऊन तटबंदी उभारण्याचे काम बंद होत असे. वारंवार बांधकामामध्ये अडथळे येऊ लागल्याने राणा कुंभ चिंतीत झाले. आपल्या चिंतेचे निवारण करण्याकरिता त्यांनी एका महात्म्याला बोलविणे धाडले. त्या महात्म्याने राणा कुंभाला सांगितले, की जोवर मानवबळी दिला जाणार नाही, तोवर ह्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण होणार नाही. महात्म्याची वाणी ऐकून राणा कुंभ चिंतीत झाले. बळी देण्याकरिता कोण पुढे येणार ही चिंता त्यांना सतावू लागली. राणाची चिंता समजून घेत महात्म्याने स्वतःचा बळी देण्याची तयारी दर्शविली. आपण किल्ल्यावर पायी चालू आणि जिथे थांबू तिथेच बळी दिला जाऊन तिथे देवीचे मंदिर बांधण्याची सूचना महात्म्याने राणा कुंभास दिली.

महाम्याने सांगितल्याप्रमाणे चालण्यास सुरुवात केली. ३६ किलोमीटर चालल्यानंतर महात्मा थांबले आणि त्यांच्या सूचनेनुसार तिथेच त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जिथे त्यांचे शिर पडले तिथे किल्ल्याचे मुख्य द्वार ‘हनुमान पोल’ बांधण्यात आले, आणि जिथे त्यांचे धड पडले तिथेही अजून एक मुख्य द्वार बांधण्यात आले. अश्या रीतीने नरबळी दिल्यानंतर या तटबंदीचे काम अखेर पूर्ण झाल्याची कथा आज ही प्रसिद्ध आहे.

महाराणा कुंभ यांच्या अधिपत्याखाली एकूण ८४ किल्ले असून, त्यातील ३२ किल्ल्यांचे पूर्ण विवरण देणारे नकाशे राणा कुम्भानी तयार करवून घेतले होते. कुंभलगड ही याच बत्तीस किल्ल्यांपैकी एक आहे.

Leave a Comment