आपली किंमत किती ?


मायकेल जॉर्डन नावाचा अमेरिकेतला बास्केटबॉलपटू होता. त्याच्या लहानपणी घरात गरिबी होती. एके दिवशी त्याच्या वडलांना कसलेच काम मिळाले नाही. मायकेल हा तेव्हा असेल १० ते ११ वर्षांचा. घरात उपासमारीची वेळ आली. काय करावे हे कळेना. घरातली एखादी वस्तू विकल्या शिवाय जेवायला मिळणार नाही असे दिसायला लागलेे. मायकेलचे वडील म्हणाले, बेटा घरात एक कपडा आहे. तो एक डॉलरचा आहे. तो विकला तर जेवण्याची सोय होईल. मात्र हा कपडा एक डॉलरला विकायचा नाही. दोन डॉलरला विकून दाखवायचाय. मायकेलला समजेना. एक डॉलरचा कपडा दोन डॉलरला कसा जाईल ? त्याने तो कपडा स्वच्छ धुतला आणि गादीखाली ठेवून त्याला इस्त्री केली. कपडा छान दिसायला लागला. त्याने तो बाजारात नेऊन दोन डॉलरला विकला.

काही दिवस बरे गेले पण पुन्हा एकदा तीच वेळ आली. आता त्याचे वडील म्हणाले, माझ्याकडे अजून एक कपडा आहे. पण तो आता दहा डॉलरला विकायचा आहे. पुन्हा मायकेलच्या डोक्याला खुराक मिळाला. आपण कापडाची किंमत वाढवू शकतो हा त्याचा आत्मविश्‍वास वाढला होता. पण आता ती किंमत दसपटीने वाढवायची होती. तो विचार करायला लागला. त्याने त्या कपड्यावर मिकी माऊसचे चित्र काढले. आपल्याच वर्गातल्या मुलाला त्याने तो दाखवला आणि त्याला तो दहा डॉलरला हवा आहे का विचारले. तो मुलगा म्हणाला, माझ्या आईला विचारून सांगतो. दुसरे दिवशी त्याची आई शाळेत आली. तिलाही तो कपडा आवडला. तिने तो दहा डॉलरला तर घेतलाच पण मायकेलला दहा डॉलर बक्षिसही दिले. एक डॉलरचा कपडा आता वीस डॉलरचा झाला होता.

त्या २० डॉलरमध्ये महिनाभर चालले. पुन्हा उपासमार. यावेळी वडील म्हणाले. अजून एक कपडा आहे पण तो १०० डॉलरला विकावा लागेल. मायकेल विचार करायला लागला. त्या दिवशी त्याच्या गावात एक सिनेमा नटी आली होती. ती एका पार्टीत गुंतली होती. मायकेल तिथे गेला आणि त्याने त्या कपड्यावर तिची सही मागितली. तिनेही एक छोटा मुलगा सही मागतो आहे म्हणून सहजपणे त्या कपड्यावर सही केली. आता या कपड्याची किंमत १०० डॉलर नक्कीच झाली आहे अशी मायकेलची खात्री झाली. त्याने तो कपडा विकायचा प्रयत्न केला, त्या सिनेनटीचा फॅन असलेल्या एका शौकीन श्रीमंत माणसाने तो कपडा केवळ त्याच्यावर आपल्या आवडत्या नटीची सही आहे म्हणून ३०० डॉ्रलर्सला विकत घेतला. या गोष्टीत व्यक्तिमत्त्व विकासाची अनेक तत्त्वे गुंतली आहेत. त्यांची चर्चा पुढच्या लेखात करू या.
(क्रमश:)