स्वप्नातल्या या गावात फोटो काढण्यास आहे बंदी


प्रत्येकाचे आपले असे स्वप्नातले एक गांव असते. त्यात झुळझुळ वाहणारी नदी, हिरवीगार कुरणे, झाडांचे दागिने ल्यायलेले हिरवेगार डोंगर, आणि मस्त निसर्ग असतोच असतो. स्वित्झर्लंड हा असाच निसर्गसौंदर्याने नटलेला देश. या देशाला एकदातरी भेट दिलीच पाहिजे असे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते. अशा या सुंदर देशातही स्वप्नातले एक गांव आहे बर्गन. हे गांव इतके सुंदर आहे की त्याची कल्पना करणेही अवघड आहे. या गावाने नुकताच एक कायदा केला असून त्यानुसार या गावाचे फोटो पर्यटक काढू शकणार नाहीत.


पर्यटन आणि फोटो यांचे अतूट नाते त्यामुळे अडचणीत आले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या गावात प्रशासनाने जागोजागी फोटो न काढण्याबद्दलच्या सूचना फलक लावले असून नियम मोडणार्‍यांना ९ डॉलर्सचा दंड केला जाणार आहे. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार पर्यटकांनी येथे यावे, डोळे भरून येथले सौंदर्य पाहावे, मनात साठवावे पण फोटो मात्र काढू नयेत. यामागचे कारण असे सांगितले जात आहे की पर्यटक फोटो काढतात सोशल मिडीयावर टाकतात. मग ज्या पर्यटकांना येथे येणे शक्य होणार नसेल ते हे फोटो पाहून निराश होतात.

जे सुटीत अन्य ठिकाणी प्रवास करू शकत नाहीत पण निरनिराळ्या ठिकाणांचे फोटो पाहतात ते मनातून निराश होतात हे शास्त्राने सिद्ध झाले आहे असेही या गावकर्‍यांचें म्हणणे आहे. या गावात नुकतीच निवडणूक पार पडली तेव्हा बहुमताने लोकांनी या गावाचे फोटो काढण्यास बंदी करावी असे मत दिल्याने हा नियम केला गेला आहे.


पर्यटन संचालक मार्क अँड्रीया यांच्या म्हणण्यानुसार फोटो काढायला बंदी असली तरी अजून तरी कुणालाही दंड केला गेलेला नाही. अर्थात ही बंदी चर्चेत यावी व पर्यटकांनी मोठ्या संख्येने या गावाला भेट द्यावी असाही त्यामागे उद्देश असल्याचे ते सांगतात. पूर्व स्वित्झर्लंडमधील हे गांव सुंदर नद्या, हिरेवेगार डोंगर, बर्फाच्छादित शिखरे, हिमनद्या यांनी परिपूर्ण आहे. प्रशासनाने या गावाचे फेसबुक व टिवटर अकौंटवरील फोटो काढून टाकले आहेत.

Leave a Comment