तुका आकाशाएवढा


कौशल्य विकासाच्या बाबतीत लक्षात ठेवायची सर्वात महत्त्वाची बाब अशी की, कोणाचाही व्यक्तिमत्त्वाचा विकास हा कौशल्य विकासाशीच निगडित असतो. या विकासाला काही मर्यादा नाही. अमर्याद वाटावी अशी प्रगती करण्याची क्षमता या निसर्गाने आपल्या प्रत्येकात ठेवली आहे. तिचा उल्लेख स्वामी विवेकानंदांनी योग्य शब्दात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इच अँड एव्हर परसन इज दी पॉवर हाऊस ऑफ ट्रिमेंडस पॉवर. प्रत्येक व्यक्ती हा अमर्याद ताकदीचा साठा असतो. या ताकदीचा विकास तर तो अणु एवढा थोकडा आहे पण ही ताकद नीट विकसित केली आणि तिचा नीट नियोजनबद्ध वापर केला तर हाच थोकडा माणूस आकाशाएवढाही होऊ शकतो.

आपल्याला देवाने जी ताकद दिली आहे ती आपल्याला माहीत नाही हा आपल्या विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे. एक तर आपल्याला तो साठा माहीतही नाही आणि ज्यांना माहीत आहे त्यांना तो साठा कसा विकसित करायचा याचे तंत्र माहीत नाही. पण आपण स्वत:ला ओळखायला शिकलो आणि आपल्यात दडलेली सूप्त शक्ती कशी प्रकट करायची याचे तंत्र माहीत करून घेतले तर आपणही फार मोठे होऊ शकतो. जगात जे लोक मोठे झाले त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला हेच लक्षात येते. त्यांनी आधी जाणणे आपणाशी आपण हे ओळखले आणि स्वत:ला जाणल्यावर त्यांना असे लक्षात आले की आपल्यात अपार क्षमता आहे. त्यांनी ती क्षमता योग्य दिशेने विकसित केली आणि त्यांना समाजासाठी काही तरी करता आले.

आपली अडचण ही आहे की आपण देवाने दिलेल्या क्षमतेचा एक छोटा अंश वापरत आहोत आणि त्याच्याच विकासात तसेच प्रकटीकरणात धन्यता मानायला लागलो आहोत. आकड्यात सांगायचे तर आपल्याला निसर्गाने १०० अश्‍वशकतीची ताकद देऊन जन्माला घातले आहे पण आपण त्यातली केवळ एक अश्‍वशक्तीचा वापर करीत आहोत. निसर्गाने आपल्याला कसलाही मोबदला न मागता जे दिले आहे त्यातला ९९ टक्के हिस्सा आपण उपयोग न करता तसाच ठेवून दिला आहे. त्यामुळे आपण सामान्य पातळीवरचे जीवन जगत आहोत पण आपण या वाया जाणार्‍या ९९ टक्के साधनापैकी दोन ते तीन टक्के साधनांचा वापर करायला लागलो तर आपल्यात होणारा बदल लोकांना आश्‍चर्य वाटावे असा असेल. यासाठी करायचे काहीच नाही. आपले वर्तन आणि स्वत:चे व्यवस्थापन बदलायचे आहे. (क्रमश:)

Leave a Comment