शहरी भारतात चौघांपैकी एक जण मधुमेही


भारत ही जाडीसोबत येणार्‍या आजारांचे केन्द्र बनले आहे. २०१० साली जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला होता की भारतात मधुमेह वाढून २०२० साली शहरातले २५ टक्के नागरिक मधुमेही झालेेले असतील. ही भयावह स्थिती येऊ नये अशीच आपली देवाकडे प्रार्थना होती पण ती काही देवाने ऐकलेली नाही. उलट २०२० साल उजडायच्या आधीच म्हणजे आताच शहरी भागातले २५ टक्के लोक मधुमेही झाले आहेत. बैठी कामे, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि थंड पेये यांचा परिणाम होऊन देशाच्या नागरी भागातील ३३ ते ५० टक्के लोक लठ्ठपणामुळे होणार्‍या कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. त्यात तणाव, पित्त, हायपर टेन्शन, हृदयविकार, रक्तदाब यांचा समावेश आहे. २०२० साली जे होणार होते ते आताच घडले आहे.

नॅशनल इस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने केलेल्या पाहणीत ही बाब आढळली आहे. त्यांनी काढलेले हे निष्कर्ष राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. यात त्यांनी १६ राज्यातल्या एक लाख ७२ हजार लोकांच्या कामाची पद्धत, सवयी आणि आहार यांचा अभ्यास केला आहे. इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या मदतीने ही पाहणी करण्यात आली. या पाहणीतली सर्वात धक्कादायम बाब म्हणजे लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणारे हे सारे विकार आता वयाच्या दहाव्या किंवा बाराव्या वर्षीच सुरू होत आहेत. मधुमेह चाळीशीत होतो असे मानले जात होते पण आता दहा वर्षाच्या मुलालाही तो होत आहे. रक्तदाब तर साठीनंतर होतो पण आता १२ ते १५ वर्षांची मुलेही रक्तदाबाचा रुग्ण व्हायला लागले आहेत.

५० टक्क्यांपेक्षाही अधिक लोक थंड पेये पीतात असे या पाहणीतून दिसून आले आहे. अशी पेये पिण्याच्या बाबतीत प. बंगाल पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र शेवटच्या क्रमांकावर आहे. व्यायामाचे प्रमाण कमी आहे. २३ टक्के पुरुष आणि फक्त १२ टक्के महिला नित्य नियमाने व्यायाम करतात. १६ टक्के पुरुष धूम्रपान करतात तर ३० टक्के पुरुष दारू पीतात. तणावातून उद्भवणार्‍या आजाराचे प्रमाण केरळात सर्वात जास्त म्हणजे ४० टक्के आहे तर हे प्रमाण बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे २२ टक्के आहे. देशातले २५ ते ४० टक्के महिला आणि पुरूष कसल्या ना कसल्या तरी गोळ्या घेत असतात. पुरूष तर व्यसनी आहेतच पण महिलाही आता अनेक प्रकारची व्यसने करायला लागल्या आहेत. त्यात सिगारेट ओढण्याच्या सवयीचाही समावेश आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment