निसर्गाने दिले ते दुर्लक्षित केले


आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर उद्योग काढावे लागतील आणि त्यासाठी लागणारे भांडवल परदेशातून आणावे लागेल. सरकार तसा प्रयत्न करतही आहे. पण तसे करताना आपल्याला निसर्गाने फुकट काय दिले आहे याचाही आपण अभ्यास केला पाहिजे पण तसा तो करण्यात आलेला नसल्याने आपण मागे पडत आहोत. निसर्गाने आपल्याला तीन बाजूंनी समुद्र किनारा दिला आहे आणि हिमालयातील पर्वतराजींच्या रूपाने नयनमनोहर पर्यटन स्थळे दिली आहेत. शिवाय भारतात मंदिरे, किल्ले आणि जलाशये यांनी अनेक पर्यटन स्थळे निर्माण करण्याची पार्श्‍वभूमी तयार केलेली आहे. या सगळ्या पर्यटन स्थळांकडे परदेेशी पर्यटकांना केवळ आकृष्ट करायचे आहे आणि त्यांच्या चांगल्या सोयी करायच्या आहेत. तेवढे केले की पर्यटन व्यवसायाचा एवढा विकास होईल की त्यातून मिळणारे उत्पन्न हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होईल.

हे करताना निसर्गाने आपल्याला काय दिलेले आहे याचा केवळ चांगला अभ्यास करायचा आहे. पण तसा तो आजवर केला गेलेला नाही. जगातल्या पर्यटन व्यवसायाचा केवळ एक टक्का एवढाच व्यवसाय आपण करत आहोत. तो कितीतरी वाढवता येतो. यूरोप आणि अमेरिका तसेच सिंगापूर या देशांपेक्षा भारतातले पर्यटन स्वस्त असल्याने आपण या क्षेत्राचा चांगला विकास करू शकतो पण तसा तो करण्यात आलेला नाही. भारतात सत्तेवर आलेल्या सरकारांनी ही संधी गमावली आहे. जागतिक पर्यटन व्यवसायात भारताचा हिस्सा केवळ एक टक्का एवढा कमी असूनही त्यातून आपल्या देशाला १ लाख ५६ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळते. हा व्यवसाय यापेक्षा दसपटीने वाढू शकतो.

या व्यचसायाची ही क्षमता पाहिली म्हणजे पर्यटन व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर आपल्या विकासाला हातभार लावू शकतो याची कल्पना येते. कमीत कमी गुंतवणुकीत ही वाढ होऊ शकते. आता केन्द्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी या गोष्टीचा आढावा घेतला असून येत्या पाच वर्षात पर्यटन उद्योग दुप्पट करण्याची योजना आखली आहे. ही योेजना पुरी झाली म्हणजे देशातल्या १० कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असा त्यांचा दावा आहे. हा दावा पाहिला म्हणजे आपल्या विकासाचा किती मोठा व्यवसाय आपण आजवर दुर्लक्षिला होता याचा अंदाज येतो.

Leave a Comment