मुंग्याविषयी मनोरंजक माहिती


मुंग्या हा कीटक आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात या मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी घराघरातून दिसतात. मुंग्या एका ठिकाणी साठविलेले अन्न दुसरीकडे नेताना पाहिल्या की हमखास पाऊस येणार असा होरा बांधला जातो व तो खराही आहे. तोंडात कसला ना कसला अन्नाचा कण, मेलेली झुरळे, बारीक किडे धरून कुठेही न थांबता व न थकता सतत धावपळ करणार्‍या मुंग्या तसा कुतुहलाचा विषय आहे. मात्र आपल्याला या मुंग्याविषयी फारच थोडी माहिती असते. मुंग्यांचे विश्व फारच मनोरंजक आहे ते थोडक्यात जाणून घेऊ या.


जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्या आहेत. आपण नेहमी लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या पाहतो पण हिरव्या रंगाच्या मुंग्याही असतात. मुंगी दिसते एवढीशी पण तिच्या वजनाच्या २० पट अधिक वजन ती वाहून नेऊ शकते.


मुंग्यांमध्ये एक राणी मुंगी असते तिला पंख असतात. राणी मुंगी लाखो अंडी घालते. मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८ वर्षांचे असते तर राणी मुंगीचे आयुष्य सरासरी ३० वर्षांचे असते.मुंग्यांना कान नसतात. जमिनीच्या कंपनांवरून त्या अंदाज घेतात. मुंग्या एकमेकींशी लढल्या तर ही लढाई आर या पार होते. म्हणजे कुणा एकाचा मृत्यू होईपर्यंत ती थांबत नाही.


मुंग्या एकाच रांगेत चालतात. कारण त्यांच्यामधून एक प्रकारचा पातळ पदार्थ बाहेर पडतो व त्याचा वेध घेऊनच मागच्या मुंग्या चालतात. मेलेल्या मुंगीच्या शरीरातून एक प्रकारचे रसायन पाझरते त्यावरून बाकी मुंग्या ती मेल्याचे जाणतात. विशेष म्हणजे हे रसायन जिवंत मुंगीच्या अंगावर टाकले तरी बाकीच्या मुंग्या ती मेली असेच मानतात.


अन्नाची साठवण फक्त माणूस व मुंग्याच करतात. मुंगीच्या शरीराची रचना अशी असते की विमानातून तिला खाली फेकली तरी तिला जखम होत नाही. मुंग्या झोपत नाहीत. पाण्यातही त्या २४ तास जिवंत राहतात. मुंग्याना दोन पोटे असतात. एक स्वतःसाठी तर दुसरे दुसर्‍यासाठी अन्न साठवते.

पृथ्वीवरील माणसांचे एकत्र जेवढे वजन होईल तेवढ्याच वजनाच्या मुंग्या पृथ्वीवर आहेत. डायनोसोरच्या काळातही मुंग्या होत्याच. आता बोला!

Leave a Comment