अनमोल मनुष्यबळ


आपण जगातल्या अनेक देशांत जायला लागलो तसा आपल्या अनुभवाचा पैस वाढायला लागला आणि जगालाही भारतीय लोक जवळून बघायला मिळाले. प्रगत देशातल्या कथित बुद्धीवान तरुण आणि तंत्रज्ञांइतकेच भारतीय तरुण बुद्धीमान आहेत असे दिसायला लागले. आपल्या तरुणांची बुद्धीमत्ता आणि कर्तबगारी अनेकदा दिसायलाही लागली. माहिती तंत्रज्ञान, अवकाश संशोधन. वैद्यकीय व्यवसाय यात भारतीयांच्या प्रतिभेचा अनुभव यायला लागला. किंबहुन अनेक क्षेत्रात भारतीय आघाडीवर आहेत असेही दिसायला लागले. जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट़स् यांनीही भारतीय तरुण गुणवत्तेत कोठेही कमी नाहीत याची अनेकदा ग्वाही दिली. कारण अमेरिकेच्या संगणक क्षेत्राची काशी म्हणवल्या जाणार्‍या सिलिकॉन व्हॅलीत अनेक भारतीयांनी गरुड भरारी घेतल्याचे त्यांनी पाहिले होते.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना तर भारतीय तरुणांचे लोकसंख्येतले प्रमाण आणि या तरुणांची गुणवत्ता यांची एवढी तीव्र जाणीव होती की ते अनेकदा तिचा उल्लेख करत असत. त्यांनी अमेरिकेतल्या एका विद्यापीठातल्या अमेरिकी विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांच्या मनातली ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली होती. त्यांनी आपल्या देशातल्या तरुणांना बजावले होते की, आज अमेरिका जगात अव्वल स्थानावर आहे हे खरे आहे पण अमेरिकेचा हा पहिला क्रमांक भारतातले तरुण झोपलेेले आहेत म्हणून आहे. भारतीय तरुणांत अमेरिकेशी बरोबरी करण्याइतकी गुणवत्ता आहे पण ती गुणवत्ता प्रकट करण्याचे तंंत्रज्ञान त्यांना माहीत नाही, त्यांना त्याचे प्रशिक्षण मिळालेले नाही म्हणून ते मागे पडले आहेत. त्यांना हे प्रशिक्षण मिळाले तर ते बघता बघता अमेरिकेच्या पुढे जातील. बराक ओबामा यांच्या या इशार्‍यावरून आपण मात्र जागे होत नव्हतो.

२०१४ साली नरेन्द्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मात्र याबाबत जागरूकता प्रकट केली. भारतीय तरुणांनी भारताला महाशक्ती बनवण्याची क्षमता प्राप्त करायची असेल तर त्यांना हे प्रशिक्षण मिळाले पाहिजे असा विचार करून मोदी यांनी कौशल्य विकास सहा कार्यक्रम पहिल्यांदाच सरकारच्या अजेंड्यावर घेतला. केन्द्रीय मंत्रिमंडळात त्यांनी उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास या विषयांसाठी स्वतंत्र खाते तयार केले आणि या खात्याला स्वतंत्र कार्यभार असलेला राज्यमंत्री नेमला. देशातल्या तरुणांना अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी अनेक योजना आखल्या. हा विषय प्रथमच ऐरणीवर येत होता. एवढा महत्त्वाचा आणि एका अर्थाने देशाच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरणारा विषय एवढ्या उशिराने अजेंड्यावर यावा हे दुर्दैवच म्हणावे लागेल पण उशिराने का होईना तो आला हे महत्त्वाचेच आहे.(क्रमश:)

Leave a Comment