स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे किशोरांमध्ये होऊ शकते झोपेची समस्या


स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये झोपेची समस्या उद्भवू शकते तसेच त्यांना निद्रानाश होऊ शकतो. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे.

दिवसातून दोन तासांपेक्षा अधिक वेळ या गोष्टींवर घालविला, तर या मुलांना झोप पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला सात तासांपेक्षा कमी झोप होणे हे बहुतांश शास्त्रज्ञांच्या मते अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे. शास्त्रज्ञांना आढळले, की 2015 मध्ये सुमारे 40 टक्के किशोऱ सात तासांपेक्षा कमी वेळ झोपत होते.

हे संशोधन करणाऱ्यांनी 3,60,000 पेक्षा अधिक किशोरवयीन मुला-मुलींच्या दोन सर्वेक्षणांची आकडेवारी तपासली. यात सान डिअॅगो स्टेट यूनीव्हर्सिटीतील संशोधकही सामील होते.

‘स्लीप मेडिसिन’ नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जे किशोर अधिकाधिक वेळ ऑनलाईन घालवतात, त्यांनी झोप तेवढीच कमी मिळते, असे या संशोधकांनी म्हटले आहे.