जगामधील काही पर्यटनस्थळी असलेली ‘ हटके ‘ निवासस्थाने


प्रवास करणे म्हणजे दरवेळी नवनवीन अनुभवांना सामोरे जाणे. मग हा प्रवास पाठीवर बॅकपॅक घेऊन मन मानेल तशी भटकंती करून केलेला असो, किंवा नवीन शहराला किंवा देशाला भेट देताना तेथील टुमदार गावांमधील सुंदर हॉटेल्स मध्ये राहत केलेला असो, प्रत्येक प्रवासाचा अनुभव आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो हे मात्र खरे. आपल्या जगामध्ये काही पर्यटनस्थळे अशी आहेत, जिथे गेल्यावर तिथली राहण्याची व्यवस्था बघून आपण क्षणभर का होईना, पण चक्रावून जाऊ. पण हा ही अनुभव खूप रोचक असेल, यात मात्र शंका नाही.

दक्षिणी जॉर्डनमध्ये असलेल्या वॉडी रम वाळवंटामध्ये कॅम्पिंग करण्याचा अनुभव मोठा रोचक समजला जातो. हे कॅम्पिंग जिथे आयोजित केले जाते त्या ठिकाणाला ‘ वॉडी रम नाईट लक्झरी कॅम्प ‘ असे म्हणतात. या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी फुग्याच्या आकाराचे तंबू असून, हे तंबू सर्व सुखसोयींनी परिपूर्ण आहेत. या ठिकाणच्या जवळपास कुठे ही मनुष्यवस्ती नसल्याने कुठे ही दिव्यांचा झगमगाट नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या तंबूच्या बाहेर बसून असंख्य ताऱ्यांनी लखलखणारे आकाश बघण्याचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. त्यांशिवाय येथील तंबूंची छते पारदर्शी असल्याने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली पडून राहण्याची मजा ही काही औरच.

जर तुम्ही प्रचंड ऊंचीवरील ठिकाणी जाऊन राहण्यास उत्सुक असाल, तर अॅम्स्टरडॅम येथील ‘क्रेन हॉटेल फाराल्डा’ या ठिकाणाला अवश्य भेट द्या. आयजे नदीच्या किनारी हे क्रेन टॉवर्स आहेत. या ठिकाणी तीन पंचतारांकित निवासस्थाने असून, या ठिकाणाहून संपूर्ण अॅम्स्टरडॅम शहर दृष्टीक्षेपात येते.

फिनलंड देशामधील ‘आर्क्टिक ट्रीहाउस हॉटेल’ हे आर्क्टिक सर्कलमध्ये स्थित आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक येथील सुंदर निसर्गाच्या सान्निध्याचा मनसोक्त अनुभव घेऊ शकतो. येथील भल्यामोठ्या वृक्षांवर बनविल्या गेलेल्या केबिन्स मध्ये राहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. या केबिन्स च्या भिंती पारदर्शक काचेने बनविल्या गेल्या असल्याने आपल्या अवतीभोवती असलेल्या सुंदर निसर्गाचा मनसोक्त आनंद पर्यटकांना उपभोगता येतो. त्याचप्रमाणे फिनलंड येथील ‘ काक्सलाऊतानेन इग्लू व्हिलेज ‘ या ठिकाणी काचेची ‘ इग्लू ‘ ( गोलाकार छोटी तंबूवजा घरे ) बनविलेली असून, फिनलंड येथील मुख्य नैसर्गिक आकर्षण असलेल्या ‘ नॉर्दर्न लाईट्स ‘ चे इथून नयनरम्य दर्शन घडते.

टर्कीमधील गोरेम या गावामध्ये असणारे ‘ दिवान केव्ह हाऊस ‘ इथे राहण्याचा अनुभव ही पर्यटकांकरिता आगळावेगळा आहे. एका परिवाराच्या वतीने हे ‘ दिवान केव्ह हाऊस ‘ चालविले जाते. या निवासस्थानामधील खोल्या खरेतर नैसर्गिक गुफा असून, त्यांचे निवासस्थानामध्ये रूपांतर केले गेले आहे. या ठिकाणाहून आकाशामध्ये विहार करीत असणारे ‘ हॉट एअर बलून्स ‘ मोठे सुंदर दिसतात.

Leave a Comment