गर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी


गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही सौंदर्यप्रसाधने, औषधे महिलांनी आवर्जून टाळायला हवीत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या औषधांच्या किंवा प्रसाधनांच्या वापरामुळे, जन्माला येणाऱ्या बाळाच्या विकासावर अनुचित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे स्त्रीरोगतज्ञांचे म्हणणे आहे. लिपस्टिक, लिप ग्लॉस, लिप बाम, आय लायनर, मस्कारा, डीओडरंट , फाऊंडेशन, हेअर डाय, इत्यादी सौंदर्यप्रसाधने, त्यांच्यामध्ये वापरल्या गेलेल्या रसायनांमुळे शरीरास नुकसानकारक ठरू शकतात. तसेच रेटीनॉइड्स असलेली प्रसाधने जन्माला येणाऱ्या बाळाच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकतात. साधारणतः मुरुमे किंवा पुटकुळ्या येण्यापासून रोखण्यासाठी जी क्रीम्स बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्यांमध्ये रेटीनॉइड्स असतात. त्यामुळे गर्भारपणामध्ये ह्या क्रीम्स चा वापर करू नये.

ट्रायक्लोसान आणि ट्रायक्लोकार्बन ह्या अँटी बॅक्टेरियल रसायनांचा वापर डीओडरंट्स मध्ये, व अंगाला लावण्याच्या साबणांमध्ये केला जातो. या रसायनांमुळे गर्भारशी महिलेच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच पॅराबेन्स हे प्रिझर्व्हेटिव्ह तत्व साबण, शॅम्पू व कंडीशनर्स मध्ये वापरले जाते. त्यामुळे या प्रसाधनांचा वापरही काळजीपूर्वकच करावा. याला उत्तम पर्याय म्हणजे केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा यांसारखे नैसर्गिक पदार्थ वापरावेत. तसेच त्वचेची निगा राखण्याकरिताही नैसर्गिक तेलांचा वापर करावा.

फॉर्मलडीहाइड हे रसायन ही शरीरास अतिशय घातक असून हे रसायन नेल पॉलिश मध्ये असते. या रसायनाचा प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. टोल्युएन हे रसायन नखांना चमकविण्यासाठी वापरल्या जाणारी प्रसाधानांमध्ये होतो. या पदार्थामुळे शरीरातील नर्व्हस सिस्टम वर विपरीत परिणाम होऊ शकतो. थॅलॅटीस हे रसायन जवळ जवळ सर्वच सौंदर्य प्रसाधानांमध्ये असते. या रसायानामुळे शरीरातील होर्मोन्स मध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने वापरताना दक्षता बाळगणे चांगले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment