कडू कारले त्याने आपल्याला तारले


वांग्याची भाजी सर्वांना आवडते. पण त्या खालोखाल मेथी ही सर्वांची आवडती भाजी आहे. ती काही प्रमाणात कडूही लागते. त्यातल्या त्यात तिचे बी तर कमालीचे कडू असते. तरीही आपण ताटात मेथीची भाजी सहन करतो. कारल्याला मात्र आपण कधीच थारा देत नाही. कारण ते तर थेट कडू असते. आपल्याला ते आवडत नाही तरीही घरातले मोठे लोक आपल्याला लहानपणी सक्तीने या दोन भाज्या खायला लावत असत. आपले तोेंड कडू पडावे असे तर त्यांना वाटत नसते पण कारल्याचा आणि मेथीचा कडूपणा औैषधी असतो हे त्यांना माहीत असते. या दोन कडू भाज्या आपल्या शरीरातल्या अतिरिक्त साखरेला नियंत्रित करीत असतात.

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कडू अशी एक म्हण आहे. कारल्याचा हा कधीही कमी न होणारा कडूपणा हे आपल्याला आणि त्यातल्या त्यात मधूमेह झालेल्या लोकांना वरदान आहे. म्हणूनच आयुर्वेदाने सर्वांनाच अधुन मधुन आपल्या खाण्यात कारल्याच्या भाजीचा समावेश आवर्जुन करावा असा सल्ला दिला आहे. ज्यांना मधुमेह झालेला नाही त्यांनी सवय म्हणून अधुन मधुन कारल्याची भाजी खावी. त्यांचा मधुमेह होण्याचा कालावधी वाढू शकतो शिवाय त्याचे अनेक फायदे आहेत पण ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी सकाळी उपाशीपोटी थोडा कारल्याचा रस प्यावा असे सुचविले जात असते कारण हा रस आपल्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करीत असतो. त्यातले चरंटीन हे द्रव्य हे काम करते.

मेथी हीही असाच फायदा करीत असते. इन्शुलीन तयार करण्याच्या प्रक्रियेची गती वाढवत असते. त्याने ब्लड शुगर संतुलित होते. फळांमध्ये नैसर्गिक फ्रुक्टोज असते. त्यामुळे फळे खाल्ली असता शुगर वाढते.म्हणूनच डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णाला फळे न खाण्याचा सल्ला देतात. असे असले तरीही मधुमेही मंडळी जांभळे मनसोक्तपणे खात असतात कारण जांभळातले जांबोलाइन हे द्रव्य शुगर कमी करते. हे द्रव्या जांभळाच्या बियात मुबलक असते. त्यामुळे जुने लोक व झाडपाल्यावर विश्‍वास ठेवणारे लोक मधुमेह झालेल्या लोकांना जाभळाच्या बियांची पावडर घेण्याचा सल्ला देत असतात. या पावडरी मुळे शुगर मोठ्या कालावधीसाठी कमी होते. जांभुळ ही वनस्पती पचनशक्तीवर परिणाम करणारी आहे. म्हणून जांभुळ, त्याच्या बियाची पावडर, पाने, झाडाची साल अशा सर्वांचे विविध प्रकारांनी सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment