कौशल्ये नसल्याने मागे


भारतीय तरुण जगात सर्वात बुद्धीमान आहेत. कष्टाळूही आहेत आणि समाधानी आहेत. या गोष्टी १९९० नंतर जगाला कळायला लागल्या. कारण याच सुमारास भारतात सुपर कॉम्प्युटर तयार झाला होता आणि या क्षेत्रात भारत आघाडीवर राहील असे सर्वांना जाणवायला लागले होते. याच सुमारास भारतात संगणक शास्त्राचे प्रशिक्षणही मिळायला लागले आणि भारतीय तरुण हे प्रशिक्षण घेऊन आणि न घेताही परदेशांत नोकर्‍यांना जायला लागले तेव्हा तिथे त्यांची प्रतिमा चांगली निर्माण झाली. भारतातले तरुण कमी वेतनात काम करायला तयार असतात. ते भरपूर काम करायला तयार असतात असे तिथे त्यांना नोकर्‍या देणारांना जाणवायला लागले.

एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. भारतीय लोक जगात सर्वात बुद्धीवान आहेत असे अनेकदा दिसून आले. बुद्धीमान असणे ही त्यांची क्षमता आहे. पण या क्षमतेला काही मार्गदर्शन मिळाले नाही तर तिचा काहीही उपयोग होत नाही. भारतीयांचे नेमके असेच झाले. त्यांच्या बुद्धीमत्तेला आणि परिश्रमी वृत्तीला कौशल्याची जोड दिली गेलेली नाही त्यामुळे अनेकदा ते मागे पडतात. आपल्याकडे याबाबत एक चूक झाली. शाळेत म्हणजे अभ्यासात पहिला नंबर असणे म्हणजेच हुशारी अशी व्याख्या करण्यात आली. त्यामुळे शाळेत किंवा शिकवणी वर्गात वर्षभर काही तरी घोकून पाठ करणे आणि तेच परीक्षेच्या तीन तासात उत्तर पत्रिकेत लिहून टाकणे म्हणजे हुशारी असे समजले जायला लागले. एकंदरीत पुस्तकातल्या कीड्यांना महत्त्व आले.

अनेक मुलां मुलींत अभ्यासाशिवाय इतरही अनेक कौशल्ये असतात. काही मुले खेळात निष्णात असतात तर काहींना नृत्यात चांगली गती असते. काही जणांना गाणे चांगले जमते तर काहींना व्यापाराची आवड असते पण या कौशल्यांना आपल्या शिक्षण व्यवस्थेत कसलीही प्रतिष्ठा दिली जात नाही. मात्र जीवनात हीही कौशल्ये गरजेची असतात. पण त्यांचा विकास करणे हा आपण कधी शिक्षणाचा भाग मानलाच नाही. सार्‍या जगात याच कौशल्याचे मोल जाणले लागले तसे आपल्याही देशात त्यांना महत्त्व यायला लागले. तोपर्यंत मात्र खेळात आघाडीवर असलेल्या मुला मुलींना वाया गेलेली मुले असे अभिधान प्राप्त होत असे. मात्र जीवनातल्या संघर्षात अशीच वाया गेलेली मुले तगून जातात असा अनुभव आपण घेत असतो.(क्रमश:)

Leave a Comment