प्रदूषण घेतेय २५ टक्के भारतीयांचे प्राण


कधी काळी काही तज्ज्ञ प्रदूषणांपासून सावधानतेचा इशारा देत होते पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सांगितलेले उपाय केले नाहीत. पदोपदी प्लॅस्टिक वापरत गेलो. आता जगभरात अनेक प्रकारच्या प्रदूषणांनी हैदोस सुरू केला असून दरसाल ९० लाख लोक कसल्या ना कसल्या प्रदूषणामुळे आजारी पडून अकाली मरत आहेत. लोकसंख्येत भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे पण प्रदूषण बळींत मात्र भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात दरसाल २५ लाख लोकांचे अकाली मृत्यू प्रदूषणामुळे होतात. खरे तर प्रदूषण ही विकासाची देणगी आहे पण भारतात फारसा विकास न होताच प्रदूषणाचा नंगानाच सुरू आहे. भारताने प्रदूषणाची फारशी चिंता न करता असाच विकास जारी ठेवला तर किती गंभीर चित्र असेल?

भारतात अकाली मृत्यूची काही कारणे आहेत. अपघात, व्यसनाधीनता,कर्करोग, साथीचे रोग, हिसाचार, उपासमार अशी अनेक कारणे आहेत. या कारणांनी भारतात दरसाल १ कोटी लोक अकाली मरण पावतात. या सर्व कारणांत प्रदूषण हे कारण सर्वात मोठे ठरले असून अकाली मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू एकट्या प्रदूषणामुळे व्हायला लागले आहेत. चीन हाही देश विकास करीत आहे आणि तोही प्रदूषणाची काळजी न करता मोठ्या धडाकेबाजपणे औद्योगीकरण करीत सुटला आहे. पण चीनमध्येही प्रदूषणाचे बळी काही कमी नाहीत. त्याचा क्रमांक भारताच्या खालोखाल आहे, तिथे दरसाल १८ लाख लोक प्रदूषणाने थेट किंवा अप्रत्यक्षपणे मरतात. अमेरिकेतल्या एका संस्थेने २०१५ साली ही आकडेवारी गोळा केली आहे.

प्रदूषणाने होणारे नुकसान पैशातही मोजण्यात आले आहे. २०१५ साली जगात ४ पूर्णांक ६० महापद्म डॉलर्स एवढे नुकसान प्रदूषणाने झाले होते. ते पूर्ण मानवतेच्या वट्ट उत्पन्नाच्या ६.२ टक्के होते. प्रदूषणाने अधिक नुकसान होणार्‍या देशात बांगला देश, पाकिस्तान, उत्तर कोरिया, हैती, सुदान या गरीब देशांचाच समावेश आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, या प्रगत देशांचे होणारे नुकसान त्यांच्या प्रगतीच्या मानाने नगण्य आहे. प्रदूषण करणारे कारखाने या प्रगत देशांत आहेत पण प्रदूषणाने होणार्‍या अकाली मृत्यूपैकी केवळ ८ टक्के मृत्यू या श्रीमंत देशात होतात पण ज्यांची प्रगतीच झालेली नाही अशा देशात ९२ टक्के मृत्यू होतात. आफ्रिकेतल्या अनेक देशांत तर अजून प्रदूषणविषयक कायदेही करण्यात आलेले नाहीत आणि पर्यावरणालाा धोका पोचवणार्‍या रसायनांची यादीही केलेली नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment