चंद्रावर सापडले ५० किमी लांबीचे विवर


जपानी वैज्ञानिकांनी चंद्रावर प्रचंड मोठ्या विवराचा शोध लावला असून या विवरात चांद्रमोहिमेवर गेलेले अंतराळवीर राहू शकतील व तेथील बदलत्या वातावरणातील धोकादायक किरणांपासून तसेच तापमानापासून त्यांचे संरक्षण करू शकतील असा दावा केला गेला आहे.एइएइएनई लूनर ऑर्बिटरकडून ही मिळालेली ही आकडेवारी जिओफिजिकल रिसर्च लेटरमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

जपानी संशोधक जुनिची हासयामा या संदर्भात बोलताना म्हणाले की चंद्रावर आढळलेले हे विवर ३.५ अब्ज वर्षांपूर्वीच तयार झाले असावे. भूगर्भातील हालचालींमुळे त्याची निर्मिती झाली असावी. ते ५० किमी लांब व १०० मीटर रूंद आहे. पूर्वीही हे विवर दिसले होते मात्र तो ज्वालामुखीचा लावा बाहेर येण्याचा मार्ग असावा असा अंदाज केला गेला होता. हे विवर लावापासूनच निर्माण झाले आहे मात्र यात चांद्रवीर संकटकाळात आश्रय घेऊ शकतील अ्रसे आता स्पष्ट झाले आहे. चंद्रावरच्या माटियस हिल भागात हे विवर आढळले आहे. जपान २०३० पर्यत चांद्रयान पाठविणार आहे तर चीन व भारतही चंद्रावर माणूस पाठवायची तयारी करत आहेत.

Leave a Comment