भुयारातून जाऊन करा दोन किल्ल्यांची सफर


राजस्थान राज्य म्हणजे राजामहाराजांचा इतिहास आणि त्यांनी उभारलेल्या अनेक महाल किल्यांची मुशाफिरी करण्याचे ठिकाण. राजधानी जयपूर जवळ असलेले दोन गड आमेर फोर्ट व जयगढ हे बाहेरून पाहताना दोन वेगळ्या पहाडांवर व दूरदूर दिसतात. मात्र हे दोन्ही किल्ले एकमेकांशी भुयाराने जोडलेले आहेत याची माहिती बर्‍याच जणांना नसते. आता मात्र हे भुयार पर्यटकांसाठी खुले केले गेले आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून जाण्याच्या अनुभवाबरोबरच हे दोन्ही किल्ले पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे.

आमेर फोर्ट हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते तर जयगढ हे युद्धाचे प्रतीक आहे. आमेरमधून गुप्तरित्या बाहेर पडून जयगडावर जाता यावे यासाठी त्या काळीच भुयार बांधले गेले होते. त्याचा कांही भाग जमिनीखालून तर काहंी भाग जमिनीवरून आहे. याच मार्गाने आमेर फोर्टच्या इतर भागातही जाता येते.आमेर फोर्टमधील आलिशान महाल, शिशमहाल, मानसिंग महाल, दिवाणे खास अशा इमारती आजही सुस्थित आहेत.


या दोन किल्ल्यांना जोडलेले भुयार या गडांच्या डागडुजीच्या वेळी दुरूस्त करून आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पूर्वी येथे आत जाताना उजेडासाठी मशालींचा वापर केला जात असे. जयगड हा जयपूरमधील सर्वात उंच गड असून तो मजबूतही आहे. येथून संपूर्ण जयपूरचे सुंदर दर्शन होते. या गडावर विशाल तोफ असून तिची रेंज ५० किमी आहे. ही आशियातील सर्वात मोठी तोफ मानली जाते.

आमेर गड १६ व्या शतकात राजा मानसिंह यांने बांधायला घेतला व पुढे २०० वर्षे त्यात नवीन बांधकामे होत राहिली. या गडाचा समावेश जागतिक वारसा स्थळात केला गेला आहे. यातील इमारती पांढर्‍या व लाल रंगाच्या सँडस्टोनमध्ये बांधल्या गेल्या आहेत.

Leave a Comment