व्यायामाचा कंटाळा


आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सार्‍या जगाला योगाचे महत्त्व कळावे म्हणून दरसाल २१ जून हा दिवस योग दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले. युनोने ही सूचना स्वीकारली आणि जगभर हा दिवस योग दिन म्हणून पाळला जात आहे. योग ही भारताने मानवतेला दिलेली मोठी देणगी आहे. ती स्वीकारून आज यूरोप आणि अमेरिकेत लाखो लोक नित्य योगोपासना करतात आणि त्याच्या लाभाचा अनुभव घेेतात. पण ज्या भारत देशाने जगाला ही देणगी दिली आहे त्या भारतातले लोक योगाबाबत किती जागरूक आहेत याची पाहणी केली असता असे आढळून आले की या देशाच्या तरुण पिढीत योगाविषयी जागरूकता नाही. केवळ योगच नाही तर अन्य कोणताही व्यायाम करण्याबाबत ही पिढी दक्ष नाही.

एका इंग्रजी दैनिकाने केलेल्या पाहणीत या देशातले ७० टक्के तरुण आणि तरुणी नित्य कसलाही व्यायाम करीत नाहीत. आपल्याला लहानपणापासून शाळांत आणि महाविद्यालयात आरोग्यासाठी व्यायाम केला पाहिजे असे शिकवलेले असते. ही गोष्ट सर्वांना माहीतही असते पण असे असूनही या देशातले ७० टक्के तरुण नियमाने कसलाही व्यायाम करीत नाहीत. आरोग्यासाठी व्यायामा बरोबरच आहारावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे असते. शिवाय आहाराचे अनेक नियम पाळूनही आपण आपले आरोग्य टिकवू शकतो पण पाहणीत असे आढळून आले आहे की, ६७ टक्के तरुण आणि तरुणी आहाराच्या बाबतीत कसलेही नियम पाळत नाहीत. जमेल तेव्हा मिळेल ते खाण्याकडे त्यांचा कल आहे असे दिसून आले आहे.

या ७० टक्क्यातल्या बहुतेकांना व्यायामाचे महत्त्च कळते पण नित्य व्यायाम करण्याबाबत ते आग्रही नाहीत. काही जण व्यायाम सुरू करतात. काही जण जिमला जातात पण त्यांचा नित्य व्यायाम करण्याचा निर्धार फार तर महिनाभर टिकतो आणि काही निमित्ताने त्यात खंड पडायला लागला की, व्यायाम कायमचा बंद होतो. अनेकांनी मनात असतानाही व्यायामाबाबत आग्रही राहता येत नाही अशी सबब सांगितली. कारण सध्या आपले जीवन फार दगदगीचे झाले आहे. सततचे बाहेरचे दौरे आणि रात्री उशिरापर्यंत जागावे लागणे यामुळे सकाळी लवकर उठता येत नाही आणि सकाळी उठायला उशीर झाला की मग व्यायाम करण्याचा उत्साह रहात नाही. असे त्यांनी सांगितले. काय खावे आणि काय खाऊ नये याबाबतचे नियमही घराबाहेर पडल्यास पाळणे कठिण होते असेही अनेकांनी सांगितले

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment