ते स्वयेचि कष्टत गेले


शेती व्यवसायात स्वत: कष्ट केले आणि प्रक्रिया उद्योग करून स्वत:ची उत्पादने दलालांना टाळून स्वत:च विकली तर आश्‍चर्य वाटावे एवढे यश मिळू शकते हे पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील गुरुदेव कौर या महिलेने दाखवून दिले आहे. ९ वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडून शेती करायला सुरूवात केली. शेती व्यवसाय करताना किती उपक्रम करता येतात याचा अभ्यास करून त्यांनी शेतीत जीव ओतला आणि आज परिस्थिती अशी आहे की त्यांची उलाढाल ४० लाखाची असून त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे ३०० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना शेतीत काही तरी करून दाखवायचे होते म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडली तरी त्यांना फार काही अडचणी आल्या नाहीत पण त्यानंतर काही वर्षातच त्यांचे पती निवृत्त झाले तेव्हा मात्र पैशाचे प्रश्‍न निर्माण झाले.

मात्र या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी आपला प्रयोग यशस्वी करून दाखवला. शेतीत प्रयोग करण्याची एवढी उर्मी होती पण त्यांची शेती फार मोठी असेल असे आपल्याला वाटू शकते. प्रत्यक्षात त्यांची शेती अडीच एकर होती. पंजाबात शेतीला पाणी मिळते कारण पाणी विपुल आहे. या एका जोरावर त्यांनी शेती करण्याचे धाडस केले. हे धाडस केले असले तरी शेती नेमकी कशी करायची असते हे त्यांना माहीत नव्हते म्हणून त्यांनी पंजाब कृषि विद्यापीठात जाऊन दीड महिन्याचा एक अभ्यासक्रम पुरा केला. या अभ्यासक्रमात त्यांना फळे, भाजीपाला यांचे उत्पादन कसे घ्यावे याची तर माहिती झालीच पण सेन्द्रीय खत कसे तयार करावे याचीही माहिती त्यांना झाली.

एवढ्याशिक्षणावर त्यांनी शेताचे लहान लहान प्लॉट करून त्यावर फ्लॉवर, सिमला मिरची, काकडी आदि भाज्यांचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली. त्याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालनही सुरू केले. यातून निर्माण झालेला मध कोणातरी दलालाला न विकता तो स्वत:च बाटल्या भरून मोठया मॉलमध्ये विकायला सुरूवात केली. मधाची विक्री स्वत:च केल्यामुळे त्यांना चांगली किंमत मिळालीच पण बाटल्या भरण्यासाठी काही महिला कामाला लावल्या. त्यांना रोजगार मिळाला. नंतर त्यांनी लोणची तयार करायला सुरूवात केली. बचत गट संघटित केले आणि शेतीमालावर प्रक्रिया करण्याची शेतकरी कंपनी स्थापन केली. कोणत्याही मालाची विक्री स्वत: केल्यामुळे फायदा जास्त होतो असा त्यांचा अनुभव आहे. त्यांना जसबीर कौर पुरस्कार मिळाला आहे