कुशल तरुण हीच खरी संपत्ती


भारताची लोकसंख्या हे वरदान ठरू शकते याची जाणीव आपल्याला डॉ. कलाम यांच्यामुळे व्हायला लागली. भारतात वृद्धांची संख्या आणि काम करण्याची क्षमता असणार्‍या तरुणांची संख्या जास्त हा डेमॉग्राफिक डिव्हिडंड अनुभवाला येत आहे. ही स्थिती २०५० सालपर्यंत टिकून राहील असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमेरिका, जर्मनी, नार्वे, स्वीडन, जपान अशा प्रगत देशातली स्थिती मात्र उलट आहे. चीनमध्येही वृद्धांची संख्या मोठी होत चालली आहे. त्या तुलनेत तरुणांची संख्या कमी आहे कारण चीनने १९७६ पासून कुटुंब नियोजनाचा कडक कायदा केला आणि एका दांपत्याला एकच मूल असेल असे जाहीर केले. दुसरे मूल हे बेकायदा ठरवले.

म्हणजे चीनमध्ये १९७६ नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या कमी आहे. याचा अर्थ आज ज्यांचे वय ४० वर्षे आहे त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांची अर्थात तरुणांची संख्या चीनने आपल्या हाताने कमी करून घेतली आहे. कुटुंब नियोजनाचा अतिरेक त्यांना असा महागात पडला आहे. भारतातही काही लोक कुटुंब नियोजनाची सक्ती असली पाहिजे अशी भूमिका घेतात पण या सक्तीचा चीनला पश्‍चात्ताप झाला आहे. चीनमध्ये तरुणांची संख्या कमी आणि वृद्धांची संख्या जास्त आहे. तोही देश आता म्हातारा होत चालला आहे. चीनचे सरासरी वय ४० वर्षे तर अमेरिकेचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. भारत मात्र सरासरी १८ वर्षांचा आहे. म्हणूनच राजीव गांधी यांनी म्हटले होते. भारताची संस्कृती जुनी आहे पण लोकसंख्या मात्र तरुण आहे. या अभूतपूर्व स्थितीमुळे सारे जग हे मान्य करीत आहे की, आगामी ४० वर्षे भारताची आहेत.

आपण ज्या तरुणांच्या संख्येवरून एवढे दावे करीत आहोत ती तरुणांची केवळ संख्या काही कामाची नाही. संख्या मोठी आहे पण या संख्येच्या हातात कसलीच कौशल्ये नाहीत तर ही संख्या केवळ ओझे ठरेल. तेव्हा संख्याही मोठी हवी आणि ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम हवी. तरच तिच्या जोरावर आपण महाशक्ती बनण्याची स्वप्ने पाहू शकतो. आपल्या सुदैवाने आपल्या देशात शिक्षणाच्या सोयी बर्‍याच निर्माण झालेल्या असल्याने तरुण पिढी सुशिक्षित आहे. तिला अनेक प्रकारची तंत्रे अवगत आहेत. जगातल्या दर चार तरुणांतला एक तरुण भारतीय आहे तर जगातल्या दर दोन तंत्रकुशल तरुणांमागे एक युवक भारतीय आहे. म्हणजे जगातले ५० टक्के तंत्रज्ञ भारतात राहतात. (क्रमश:)