लंकेत येथेच दिली होती सीतेने अग्नीपरिक्षा


श्रीलंकेतील नुवार भागात पहाडांच्या मधोमध असलेले सीताअम्मा मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. असे सांगितले जाते की येथेच सीतेने अग्नीपरिक्षा दिली होती. विशेष म्हणजे या भागातील माती राखेच्या रंगाची आहे. श्रीलंकेत सर्वत्र लाल किंवा भुर्‍या रंगाची माती दिसते मात्र या भागात ही वेगळ्याच रंगाची माती आहे. या भागात दाट अरण्य असून तेथे अशोक वाटिका होती असेही सांगितले जाते. या भागात वेगळ्याच प्रकारची अशोकाची झाडे आढळतात व त्यांना सीता अशोक असे म्हटले जाते.त्यांना एप्रिलमध्ये लाल फुले येतात.


या भागात सीता मंदिरासमवेत अनेक अन्य मंदिरेही आहेत. मात्र विशेष म्हणजे सीतेच्या मंदिरातच फक्त वानरे दिसतात. येथेच हनुमानाने सीतेला रामाने दिलेली अंगठी खूण म्हणून दाखविली होती. त्यामुळे येथे रिंग फेस्टीव्हल साजरा केला जातो. असे सांगतात की हनुमानाने संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरीचा कांही भाग उचलून येथे आणला होता. त्यातील कांही वनस्पती आजही येथे आढळतात व लंकन आयुर्वेदामध्ये त्यांचे औषधी उपयोग केला जातो.

येथील सीताअम्मा मंदिरात हनुमानाच्या वीर योद्धा स्वरूपातील अनेक प्रतिमा आहेत. सीता अम्मा मंदिरात एक दिवस पूजा केली जाते व त्यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक येथे हजर असतात. मंदिराचे कळस सूर्यप्रकाशात सोन्यासारखे झळकतात. रामायणाच्या अभ्यासकांच्या मते सीताचे श्रीलंकेत साधारण ११ महिने वास्तव्य होते.

Leave a Comment