व्हिजन २०२० या ग्रंथात भारताच्या वििऐध क्षेत्रातल्या क्षमतांचा सविस्तर आणि वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण असा आढावा घेण्यात आला. तसा तो प्रथमच समोर येत होता आणि आपण किती समर्थ आहोत याची माहिती लोकांसमोर येत होती. हा सारा ग्रंथ काही सर्वांना वाचायला मिळाला नाही पण त्यातल्या काही निवडक गोष्टींची देशात फार व्यापक चर्चा झाली. आपल्या देशाची जगात फार वाईट प्रतिमा होती. भारत म्हणजे हत्ती, साप, साधू आणि बायकांना जाळून मारणारे नवरे यांचा देश आहे आणि इथले साधू नेहमी आपल्या गळ्याभोवती साप गुंडाळून फिरत असतात. हा देश गरीब आहे. इथे भुकेलेल्या लोकांची संख्या मोठी आहे असा जगाचा समज होता.
व्हिजन २०२० ने आत्मविश्वास वाढवला
थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, आजच्या आफ्रिकेतील सुडान, मोझांबिक अशा देशांची जी प्रतिमा आज जगासमोर येत आहे तशीच भारताची प्रतिमा होती. नवल म्हणजे आपणही आपल्या देशाला दरिद्री, मागासलेला देश समजत होतो पण व्हिजन २०२० तून जी माहीती समोर आली. तिच्याने आपल्या आणि जगाच्याही नजरेत आपली प्रतिमा बदलून जायला सुरूवात झाली. भारतात जगातली सुपर पॉवर अर्थात महाशक्ती होण्याची ताकद आहे असे या पुस्तकात म्हटले होते. सुदैवाने याच काळात भारत सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असल्याने आर्थिक चित्र बदलत चालले होते. देशाच्या औद्योगी करणाला चालना मिळायला लागली होती. माहिती तंत्रज्ञानात भारताची पावले वेगाने पडायला सुरूवात झाली होती. भारताचे उपग्रह त्याच्याच तंत्रज्ञानाच्या साह्याने अंतराळात झेपवायला लागले होते.
ही पावले वेगाने पडायला लागल्यामुळे भारत ही २०२० साली महाशक्ती बनलेली असेल या डॉ. कलाम यांच्या भाकितावर लोकांचा विश्वास बसायला लागला होता. भारतात २०२० साली महाशक्ती ही घोषणा मोठी लोकप्रिय झाली होती. डॉ. कलाम यांनी आपल्या देशाची क्षमता किती आहे हे दाखवले होते आणि त्या क्षमतेचा नीट वापर केला तर आपण जगातली महाशक्ती होऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता. या ध्येयाप्रत जाण्यासाठी डॉ. कलाम यांना दोन साधने उपयोगी पडतील असे खात्रीने वाटत होत. ही दोन साधने म्हणजे तंत्रज्ञान आणि दुसरे साधन देशातले तरुण. या दोन साधनांचा वापर करून आपण चित्र बदलू शकतो असा डॉ. कलाम यांचा दावा होता.