जगातला सर्वात तरुण देश


माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना भारत देेश महाशक्ती होईल अशी खात्री वाटत होती आणि त्यासाठी लागणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भारतात आहे हे लोकसंख्या विषयक आकडेवारीवरून दिसून आले होते. भारताची लोकसंख्या जगात दुसर्‍या क्रमांकाची आहे. याबाबत चीनचा पहिला क्रमांक आहे. भारताची मोठी लोकसंख्या हा काही लोकांसाठी चिंतेचा तर काही लोकांसाठी कुचेष्टेचा विषय होता. आपली लोकसंख्या हे आपल्या गरिबीचे कारण आहे असा गैरसमज निर्माण झालेला होता. त्यामुळे ही लोकसंख्या कमी झाल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही असे मानले जात होते. अर्थात ही गोष्ट फार मर्यादित अर्थाने खरी आहे पण लोकसंख्या हेच केवळ गरिबीचे कारण आहे असे सरसकट मानता येत नाही.

विशेषत: व्हिजन २०२० हा प्रबंध प्रसिद्ध झाला तेव्हा तर लोकसंख्येकडे पाहण्याचा कुचेष्टेचा दृष्टीकोन बदलून गेला. एखाद्या देशाची लोकसंख्या कमी आहे की अधिक आहे यापेक्षा तिच्यात कोणत्या वयोगटाचे किती लोक आहेत याला जादा महत्त्व आहे हे पहिल्यांदाच आपल्याला समजले. लोकसंंख्या हे गरिबीचे कारण नाही. ते तर विकासाचे साधन होऊ शकते हे लक्षात आले कारण जगातल्या काही देशांत लोकसंख्या घटत आहे ही समस्या होऊन बसली आहे. जपान हा असाच लोकसंख्या घटत असलेला देेश आहे. या देशाची लोकसंख्या १९५० साली १२ कोटी होती. आजही ती १२ कोटीच आहे. कारण या देशाने कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी कसोशीने केली आहे. पण त्याचा परिणाम असा झाला आहे की, त्याच्या लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण जास्त झाले आहे.

जपान हा देश हा जगातला क्रमांक दोनचा श्रीमंत देश होता पण आता त्याची ही जागा चीनने घेतली आहे. जपान तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. शिवाय त्याचा हा तिसरा क्रमांकही फार दिवस टिकणार नाही. ही जागा घेण्यास भारत तयारच आहे. जपानची ही अधोगती त्याने कसोशीने केलेल्या कुटुुंब नियोजनामुळे आणि लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण वाढल्यामुळे झाली आहे. भारताच्या लोकसंख्येत १९९१ साली वृद्धांचे प्रमाण केवळ १० टक्के होते आणि ६० टक्क्यांपेक्षाही अ़िधक तरुण होते. आपल्या दृष्टीने ही जमेची बाजू होती. एखाद्या देशाच्या वाटचालीत अशी एक स्थिती येते. ती भारतात आली आहे. तिला डेमोग्राफिक डिव्हिडंड असे म्हटले जाते. भारताला महाशक्ती होण्यास या स्थितीचा मोठा उपयोग होत आहे आणि डॉ. कलाम यांनी तसा तो होईल असे आपल्या या ग्रंथात म्हटले होते.

Leave a Comment