पुण्याच्या या महिलेने फेसबुकला चूक दाखवून जिंकले १००० डॉलरचे बक्षिस


पुणे – पुण्यातील एका महिलेने संपूर्ण जगाला एका क्लिकवर एकत्र आणणार्‍या फेसबुकमध्ये बग (एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील चूक) असू शकते, हे विद्येचे माहेरघर असलेल्या सिद्ध केले आहे. या महिलेचे नाव विजेता पिल्लई असे असून फेसबुक अॅपमध्ये चुका शोधून काढल्याने तिला फेसबुकने १००० डॉलर (भारतीय चलनातील ६५००० रुपयांचे) बक्षिस जाहीर केले असल्याचे वृत्त गिजबॉट या तंत्रविज्ञान विषयक संकेतस्थळाने दिले आहे.

विजेता ही सोशल मीडियातील दिग्गज वेबसाईट ‘फेसबुक वर्कप्लेस’मध्ये त्रुटी शोधून काढणारी भारतातील पहिलीच महिला आहे. पुण्यातील रियल्ट्री प्रॉप कंपनीत विजेता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पदावर कार्यरत आहे. तिने एक बग ‘फेसबुक अॅप’मध्ये शोधून काढला.

विजेता म्हणाली की, नुकतेच आपले बिझनेस चॅटिंग अॅप वर्कप्लेस फेसबुकने लॉन्च केले होते. हे अॅप कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सर्वाधिक वापरले जाते. वर्कप्लेसमध्ये बग आढळल्याने हे अॅप वापरणार्‍या कंपनीच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो. विजेताने ही चूक फेसबुकच्या निदर्शनास आणून दिली.

विजेता यांनी तत्काळ फेसबुकला वर्कप्लेसमध्ये बग आढळून आल्याची माहिती सूचित केले. रिव्ह्यू घेतला असता बग फेसबुकच्याही लक्षात आला. फेसबुकने सांगितले की, वर्कप्लेसमधील गंभीर चूक विजेता हिने शोधून काढली आहे, ही त्रुटी एखाद्या अॅडमिनसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकली असती.