स्मार्ट फोन : भारत अमेरिकेच्या पुढे


अमेरिका जगात पुढे आणि बाकी जग तिच्या मागे हा तर रिवाजच आहे पण एखाद्या प्रगतीच्या क्षेत्रात भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आपल्याला हे ऐकून नवल वाटेल की स्मार्ट फोन वापराबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकून जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे. अधिकाधिक स्मार्ट फोन वापरण्याबाबत जगात चीनचा पहिला आणि अमेरिकेचा तिसरा क्रमांक आहे. भारताने या क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही माहिती अमेरिकेतल्याच एक नेटवर्कने केलेल्या पाहणीतून उघड झाली आहे. भारतात सगळ्या प्रकारच्या मोबाईल फोनचा वापर करणारांची संख्या १०० कोटीच्या घरात पोचली आहे.

या १०० कोटीतील ४० कोटी लोक स्मार्ट फोन वापरतात. २०१६ साली ही संख्या १३ कोटी होती पण एका वर्षात ही संख्या तिपटीने वाढली आहे. या अचानकपणे झालेल्या वाढीमुळे अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर ढकलली गेली असून भारताने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अन्यथा २०१६ सालपर्यंत स्मार्टफोन वापरणारांच्या बाबतीत अमेरिका दुसर्‍या क्रमांकावर होती. ऍनी या ऍपच्या संचालकांनी भारतातल्या स्मार्ट फोन वापरणारांच्या सवयीची पाहणी केली असता असेे आढळून आले की, भारतातले स्मार्टफोन धारक अनेक कामांसाठी हा फोन वापरत असतात. त्यामुळे त्यांचा दररोज सरासरी चार तास एवढा वेळ फोन पाहण्यात, संदेश पाठवण्यात किंवा चॅटिंग मध्ये जातो. हा वापर ही पाहणी करणारांसाठी आश्‍चर्याचा ठरला आहे.

मोबाईलवर निरनिराळे ऍप्स डाऊनलोड करण्याबाबत भारतीयांनी मोठीच मजल मारली आहे. त्याही बाबतीत २०१६ हे वर्ष क्रांतिकारक ठरले आहे. २०१५ साली हे प्रमाण तीनशे कोटी एवढे होते. ते २०१६ साली सहाशे कोटीवर गेले आहे. याचा अर्थ असा आहे की, भारतीय लोक केवळ स्मार्टफोन बाळगण्यातच पुढे आहेत असे नाही तर ते त्याचा अनेकविध पद्धतीने वापर करण्याबाबतही पुढे आहेत. वापरल्या जाणार्‍या ऍप्समध्ये व्हॉटसऍपचा नंबर अव्वल आहे. त्या खालोखाल गेमशी संबंधित ऍप्स वापरले जातात. त्याशिवाय शॉपिंग आणि ट्रॅव्हल्सशी संबंधित ऍप्सनाही चांगली मागणी आहे. अशा प्रकारच्या ऍप्सचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर होत असून आशिया खंडातल्या मोठ्या मार्केटस्मध्ये एकूण २.५ महापद्म डॉलर्सचा व्यवहार झाला आहे. याबाबतीत मात्र अमेरिका पुढे आहे.

Leave a Comment