शिवरायांचा पन्हाळा पणत्यांच्या उजेडात उजळला


कोल्हापूरपासून २३ किमी वर असलेल्या शिवाजी महाराजांच्या गडातील एक महत्त्वाचा किल्ला पन्हाळगड धनत्रयेादशीच्या रात्री हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. वर्षभर अंधारात राहणारा हा गड शिवाजींराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. कोल्हापूरमधील ट्रेकर्स ग्रुप गेली पाच वर्षे या गडावर धनत्रयोदशीला दिपोत्सव साजरा करत आहे. सोमवारी मध्यरात्री गडावर पोहोचलेल्या हजारो गडप्रेमींनी सोबत नेलेल्या पणत्या येथे पेटविल्या व गडाला एक अनोखे सुंदर रूप प्राप्त झाले.

ट्रेकर्स ग्रुपचे सागर पाटील म्हणाले गेली पाच वर्षे आम्ही हा उत्सव साजरा करतोय. पहिल्या वर्षी ५० जण होते यंदा ही संख्या हजारावर गेली. प्रथम येथील शिवमंदिरात पणती पेटविली गेली. सन्माननीयांच्या हस्ते शिवमूर्तीची पूजा केली गेली व साहसी खेळांचे आयोजनही येथे केले गेले.


शिवाजी महाराजांच्या जीवनात या गडाचे विशेष स्थान आहे. येथेच आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने महाराजांच्या या गडांला वेढा घालून त्यांना कोंडले होते. दीर्घ काळ चाललेला हा वेढा तुफान पावसातही ढिला झाला नव्हता व गडावरील दारूगोळा तसेच धान्यधुन्य संपत आल्याने महाराजांचा चिंतेने पोखरले होते. अखेर रात्रीच्या गडद अंधारात निवडक मावळ्यांसह या गडावरून गुपचूप निघून जाण्याचा अवघड डाव महाराजांची आखला आणि त्यांच्या सच्च्या साथीदारांनी तो बिनबोभाट पार पाडला. राजे गडाच्या वेढ्यातून बाहेर पडले पण जौहरच्या सैनिकांना त्याची खबर लागतात महाराजांचा पाठलाग सुरू झाला. महाराजांचे सौंगडी त्याना पालखीतून ४८ किमी दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने घेऊन केले खरे पण अखेरी शत्रूंने त्यांना गाठलेच.


त्यावेळी महाराजांचे सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या छातीची ढाल करून पावनखिंडीत शत्रूला रोखले व महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याची तोफ ऐकताच जिकीरीने शरीरात कोंडून ठेवलेले प्राण त्यागले. बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली ही घोडखिंड पावनखिंड म्हणून प्रसिद्धीस आली.

Leave a Comment