बाहुबली या सुपरडुपर चित्रपटात वापरला गेलेला महिष्मती साम्राज्याचा विशाल व भव्य सेट पर्यटकांना पाहण्यासाठी खुला केला गेला असून हा सेट पाहण्यासाठी दररोज किमान १५ ते २० हजार पर्यटक येऊ लागले असल्याचे समजते. हैद्राबादच्या रामोजी सिटीमध्ये हा सेट उभारला गेला होता. तेथेच आता पर्यटकांना तो पाहता येणार आहे.
महिष्मतीचा सेट सर्वसामान्य पर्यटकांना पाहण्यासाठी खुला
बाहुबली द बिगिनिंग व बाहुबली द कन्क्लुजन अशा दोन्ही भागात या सेटचा वापर केला गेला. त्यासाठी ५०० कामगार सतत ५० दिवस कठोर परिश्रम घेत होते. या सेटसाठी ३५ कोटी रूपये खर्च केले गेले. दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे येथे पर्यटकांची खूप गर्दी होत असल्याचेही सांगितले जात आहे. पहिल्या बाहुबलीसाठी हा सेट उभा करताना २८ कोटी रूपये खर्च केला गेला होता. पहिला चित्रपट कमालीचा यशस्वी ठरल्यानंतर दुसर्या भागाच्या वेळी या सेटमध्ये आणखी बदल केले गेले त्यासाठी ७ कोटी रूपये खर्च केले गेले व सध्याचे भव्य स्वरूप या सेटला दिले गेले असे समजते.