भारतामध्ये या पर्यटनस्थळी विनापरवाना प्रवेश नाही


परदेश भ्रमणाला निघताना त्या देशामध्ये प्रवेश करता येण्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रांची गरज लागते, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण आपल्या देशातही काही ठिकाणे अशी आहेत जिथे प्रवेश मिळविण्यासाठी खास परवान्याची गरज लागते. या परवान्याला ‘ इनर लाईन परमिट ‘ असे म्हटले जाते. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या जवळ असणाऱ्या संवेदनशील ठिकाणांना भेट देण्यासाठी या विशेष परवान्याची आवश्यकता असते. या परवान्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होते. या पैकी काही ठिकाणी राहत असणाऱ्या आदिवासी जमाती, पर्यटकांच्या आवागमनावर हरकत घेत असतात, कारण तिथे येऊन पर्यटक त्यांच्या संस्कृतीस मान्य नसलेल्या कृती करतात असे त्यांचे म्हणे असते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीच्या आणि पर्यायाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा परवाना महत्वाचा ठरतो.

अरुणाचल प्रदेश हे निसर्गासौंदर्याने नटलेले राज्य भारताच्या उत्तरपूर्वेकडे असून, ह्या राज्याच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या पश्चिमेला भूटान, उत्तरेला चीन आणि पूर्वेला म्यानमार हे देश आहेत. अरुणाचल प्रदेशचा रहिवासी नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला येथे येण्यासाठी इनर लाईन परमिटची आवश्यकता असते. हा परवाना अरुणाचल प्रदेश सरकारच्या निवासी कमिशनर कडून मिळविता येतो. हा परवाना कोलकाता, नवी दिल्ली, शिलॉन्ग व आसाम मधून मिळविता येतो, तसेच हा परवाना मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्जही भरता येतो. हा परवाना एका व्यक्तीसाठी किंवा अनेक व्यक्तींच्या एका गटासाठी देण्यात येतो. या परवान्यासाठी माणशी शंभर रुपये आकारले जात असून, हा परवाना तीस दिवसांसाठी वैध असतो. या परवान्याकरिता पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्राची प्रत आणि पासपोर्ट साईझ फोटोची आवश्यकता असते. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग, रोइंग, इटानगर, बॉमडिला, भालुकपोंग, सेला लेक इत्यादी सुंदर पर्यटनस्थळे आहेत.

सुंदर हवामान आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे असलेले मिझोरम ‘ डोंगरी जमातींचे राज्य ‘ म्हणून ओळखले जाते. या राज्यामध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत. या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा असून, सीमेपलीकडे बांगलादेश आणि म्यानमार हे दोन देश आहेत. मिझोरममध्ये प्रवेश मिळविण्याकरिताही इनर लाईन परमिटची आवश्यकता असते. हा परवाना कोलकाता, सिलचर, शिलॉन्ग, गुवाहाटी आणि नवी दिल्ली येथील जनसंपर्क अधिकाऱ्याकडून मिळविता येतो. विमानाने या राज्यामध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांसाठी ऐझॉल विमानतळावर हा परवाना मिळण्याची सोय आहे. येथे येण्यासाठी पंधरा दिवस किंवा सहा महिने वैध असलेला परवाना घेता येतो. त्यासाठी अनुक्रमे १२० रुपये आणि २२० रुपये इतके फी आकारली जाते. मिझोरम मध्ये फॉन्गपुई हिल्स, वान्तवांग फॉल्स, लेन्गतेंग अभयारण्य इत्यादी सुंदर पर्यटनस्थळे आहेत.

नागालँड राज्यामध्ये पर्यटनासाठी जाण्याअगोदर इनर लाईन परमिट मिळवावे लागते. हा परवाना दिमापुर, कोहिमा, मोकोचुंग, नवी दिल्ली, कोलकाता आणि शिलॉन्ग येथील डेप्युटी कमिशनर कडून मिळविता येतो. तसेच ऑनलाईनही हा परवाना उपलब्ध आहे. या परवान्यासाठी माणशी शंभर रुपये आकारले जातात. या राज्यामध्ये कोहिमा, दिमापुर, मोकोचुंग, वोखा, फेक, किफिरे आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. ‘ एक लक्ष द्वीपे ‘ या अर्थीच्या नावाने प्रसिद्ध असणारा द्वीपसमूह म्हणजेच लक्षद्वीप. येथे येण्यासाठीही पर्यटकांना परवान्याची गरज असून, हा परवाना विनाशुल्क उपलब्ध आहे. हा परवाना पाच महिन्यांसाठी वैध आहे. बंगाराम द्वीप, मिनिकोय द्वीप, काल्पेनी द्वीपसमूह, पित्ती पक्षी अभयारण्य इत्यादी येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जम्मू काश्मीर राज्यातील लदाख हे पर्यटनस्थळ हे राजकीय दृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीने काहीसे संवादनशील समजले जाते. लदाखच्या सीमेपलीकडे पाकिस्तान आणि चीन हे देश असून, लदाख मधील काही ठिकाणी जाण्यास मनाई आहे. येथील दाह, हनु, पँगोंग त्सो, मेराक, खारदुंग ला, नुब्रा व्हॅली, तुरतुक, इत्यादी ठिकाणी भेट देण्यासाठी इनर लाईन परमिटची आवश्यकता असते. लेह येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून हे परवाने घेता येतात. प्रवासी कंपन्या किंवा एजंट्सच्या मार्फत हे परवाने मिळविता येतात. पँगोंग लेक, शांती स्तूप, खारदुंग ला पास, नुब्रा व्हॅली, इत्यादी अनेक सुंदर पर्यटनस्थळे येथे आहेत.

सीमेपलीकडे चीन, भूतान आणि नेपाळ हे देश असलेल्या सिक्कीम या राज्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. या राज्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी देखील इनर लाईन परमिटची आवश्यकता आहे. लाचुंग, त्सोम्गो लेक, नाथुला, इत्यादी पर्यटनस्थळे या राज्यामध्ये आहेत. नाथुला व गुरुडोंगमार येथे जाण्यासाठी परवाने पर्यटन विभागाच्या सहाय्याने बागडोगरा विमानतळावर उपलब्ध होऊ शकतात.

Leave a Comment