पंजाबातील अशुभ संकेत


पंजाबच्या लुधियाना शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवीन्द्र गोसाई यांची काल झालेली हत्या हा मोठा अशुभ संकेत आहे कारण यातूनच पंजाबात पुन्हा एका दहशतवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. गोसाई यांना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी जवळून गोळया झाडल्या. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्या आधी गेल्या ऑगष्टमध्ये जालंधर शहरात संघाचे आणखी एक नेते ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांचीही याच पद्धतीने हत्या करण्यात आली. याच दरम्यान संघाच्या प्रचारकांपैकी तिघांच्या अशाच हत्या करण्यात आल्या असून या पाचही हत्यांतील आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

कोणत्याही खुनाचा तपास करताना खून झालेल्या व्यक्तीच्या संबंधात कोण आले होते आणि त्यापैकी कोणी त्याचा खून करावा यामागे काही कारण असू शकेल काय याचा शोध घेतला जातो आणि त्याचा धागा पकडून आरोपीचा छडा लावला जातो. विशेषत: कोणत्या तरी कारणाने पूर्ववैमनस्य असेल तर असे आरोपी सापडून जातात पण या पाच प्रकरणात तसा काहीच प्रकार नाही कारण हे सगळे संघाचे कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्यकर्त्यांच्या ाअशा हत्या केरळात गेल्या काही वर्षात सातत्याने होत असून त्या आता मोठ्या राजकीय वादाचा विषय झाल्या आहेत. पण पंजाबातल्या हत्या या अशा नाहीत. त्या राजकीयच आहेत पण त्यामागचा कट वेगळाच आहे. त्यामागे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत.

गेल्या महिन्यांत जालंधरमध्ये चौघा आरोपींना बेकायदा शस्त्रांसह अटक करण्यात आली होती. त्यांनी आपले संबंध परदेशात स्थायिक झालेल्या खलिस्तानवादी नेत्यांशी असल्याचे कबूल केले. १९८० च्या दशकांत पंजाबात फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. तो थांबायला आठ वर्षे लागली. त्याही मागे खलिस्तानवादी नेत्यांचाच हात होता. आता पुन्हा हे लोक आपल्या कारवाया सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच या अटक झालेल्या चौघांनी आपल्याला राज्यात हिंसाचार सुरू करण्याचा आदेश मिळाला असून हिंदू आणि शीख यांच्यात वैर वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या हत्या करण्याचे निर्देश मिळाले आहेत असे सांगितले होते. त्याचाच भाग म्हणून या हत्या झाल्या असून सरकारने अधिक सावध होण्याची गरज आहे.

Leave a Comment