या दिवाळीत उडवता नाही पण खाता येतील फटाके


सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये यंदा फटाके विक्री व उडविण्यावर बंदी घातल्याने ऐन दिवाळीत थोडी निराशा पदरी पडलेल्या दिल्लीकरांसाठी एक आनंदाची बातमीही आहे. दिल्लीकर यंदा फार फटाके उडवू शकणार नसले तरी त्यांना फटाकयांचा आस्वाद घेता येणार आहे व या फटाक्यांवर न्यायालयाची बंदी नाही.परिणामी दिवाळीचा दिपोत्सव साजरा करून दिल्लीकर त्वरीत फटाक्यांचा फराळ करू शकणार आहेत.

कोलकाता येथील हलवाई गुप्ता ब्रदर्स यांनी हा अनोखा तोडगा शोधून काढला आहे. त्यांच्या दुकानात फटाक्यांची भरमसाठ व्हरायटी ग्राहकांसाठी तैनात केली आहे. अर्थात हे फटाके म्हणजे फटाक्यांच्या स्वरूपातील विविध मिठाया आहेत. विशेष म्हणजे दिल्लीकरांनी या कल्पनेला प्रचंड प्रतिसाद देऊन या मिठाईची जोरदार खरेदी सुरू केली आहे. या दुकानात सुतळी बाँब, लक्ष्मी बाँब, चक्रे,फुलबाजा, सुरनळे किंवा झाडे, असे अनेक स्वादिष्ट प्रकार उपलब्ध आहेत. नेहमीचे गुलाबजाम व बर्फी यांनाही फटाक्यांचे आकार दिले गेले आहेत.


या दुकानात आयफोन प्रेमींसाठीही काही तरी खास आहे. आयफोन आपल्याकडे असावा अशी इच्छा असलेल्यांना या दुकानात मिठाईपासून हुबेहूब तयार केलेला आयफोनही मिळतो आहे. हा आयफोनही फस्त करता येणारा आहे.

Leave a Comment