रोमानियातील जिवंत खडक


रोमानियातील रिझर्व्ह व्हॅलसिया कौंटीमधील कोस्टेस्टी या खेड्यातील चमत्कारीक खडक जगभरातील संशोधकांसाठी कोडे बनून राहिले असून अनेक भूशास्त्रतज्ञांनी या खडकांचे अध्ययन केले आहे. हे खडक जिवंत मानले जातात कारण त्यांचा आकार आपोआप वाढतोच पण ते एका जागेहून दुसरीकडेही सरकतात. यामागे अनेक कारणे दिली जात असली तरी त्यातील कोणतेही कारण विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सिद्ध करता आलेले नाही.

वास्तविक पृथ्वीवरील खडकांचा आकार बदलत असतोच पण ही प्रक्रिया होण्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात. रोमानियातील खडक दर पावसाळ्यात त्यांचे आकार बदलतात आणि ही प्रक्रिया इतकी जलद होते की हे खडक जिवंत असल्याचे मानले जाते. पाण्याच्या संपर्कात आले की या खडकांचे आकार बदलतात. हे प्रमाण ६ मिलीमीटर पासून ६ ते १० मीटर इतके प्रचंड आहे.


शास्त्रज्ञांच्या एका गटाच्या म्हणण्याप्रमाणे या खडकांत क्षारांचे प्रमाण खूप आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर हे क्षार फुगतात व त्यामुळे खडकांचे आकार बदलतात मात्र हे सिद्ध करता आलेले नाही. या खडकांना ट्रोव्हंट असे म्हणतात. म्हणजे वाळूचे आवरण असलेले खडक. या खडकांचे आकारही विविध आहेत. पर्यटकांची हे खडक पाहण्यासाठी गर्दी होत असते.

Leave a Comment