भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत मार्गावर – आयएमएफ


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या आर्थिक वाढीचा दर कमी असल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांच्या आतच आयएमएफच्या प्रमुख ख्रिस्तीन लॅगार्द यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत मार्गावर असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी बहाल केले आहे.

“भारताच्या बाबतीत…आम्ही भारताचा काहीसा कमी केला आहे. परंतु मध्यम व दीर्घ टप्प्यासाठी भारत विकासाच्या मार्गावर आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे तो अधिक मजबूत झाला आहे,” असे लॅगार्द म्हणाल्या.

निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवाकर (जीएसटी) या अलीकडच्या दोन महत्त्वाच्या सुधारणा ऐतिहासिक असल्याचे सांगून लॅगार्द म्हणाल्या, की त्यामुळे काही काळ मंदी आल्यासारखी झाली आहे आणि त्यात फारसे आश्चर्य नाही. मात्र मध्यमकालीन टप्प्याच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आम्हाला मजबूत मार्ग दिसतो, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“तूट कमी करण्यात आली आहे, चलनवाढ लक्षणीय प्रमाणात कमी करण्यात आली आहे आणि त्यासोबत संरचनात्मक सुधारणा यांमुळे भारतीय लोकसंख्येला ज्याची प्रतीक्षा आहे, खासकरून तरुणांना, ते परिणाम मिळतील अशी आम्हाला आशा आहे,” असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment