आयकर खात्याकडून नोटीस आल्यास…


एखाद्या व्यक्तीच्या नावे आयकर विभागाकडून येणे आजच्या काळामध्ये अतिशय सामान्य गोष्ट असून त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्याउलट आलेली नोटीस कशाबद्दल आहे हे जाणून घेऊन त्यानुसार आपल्या पुढील कृतीचे नियोजन करावे. या करिता एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती ही, की आयकर विभागाकडून पाठविण्यात येणाऱ्या नोटीसा निरनिराळ्या कारणांकरिता पाठविल्या जात असतात. उदाहरणार्थ १४३(1) या कलामान्वये पाठविल्या गेलेल्या नोटीसा केवळ आपल्या माहितीसाठी पाठविल्या जातात, तर १४२(1) कलमान्वये पाठविलेली नोटीस साधारणपणे काही माहिती आपल्याकडून आयकर विभागाला हवी असल्यास, त्या संदर्भातली असते. त्यामुळे अश्या प्रकारच्या नोटीसा आल्याने गोंधळून न जाता, त्या नोटीसचे उत्तर तयार करून आपल्याला दिलेल्या वेळेआधी आयकर विभागाकडे पाठवावे. या साठी आपल्याला कशा प्रकारची नोटीस आली आहे आणि तिच्या उत्तरादाखल आपण योग्य ती माहिती कशी पाठवायची या बद्दल माहिती असणे गरजेचे ठरते.

१५६ कलमान्वये आयकर विभागाकडून नोटीस आली असल्यास त्याला ‘ नोटीस ऑफ डिमांड ‘ असे म्हटले जाते. आपल्याला भरावयाचा असलेला दंड किंवा इतर कुठल्याही प्रकारची थकबाकी या नोटीस द्वारे कळविली जाते. हे थकलेली रक्कम भरण्यास तीस दिवसांचा अवधी दिला जातो. जर तीस दिवसांमध्ये रक्कम भरली गेली नाही, तर एक टक्का व्याज प्रती महिना या दराने जितके महिने थकबाकी राहील, तितके व्याजही भरावे लागते. त्याचप्रमाणे १३६( ९ ) कलमान्वये नोटीस आली असल्यास, आपण इन्कम टॅक्स फाईल करताना जर काही चुका झाल्या असतील किंवा कागदपत्रे अथवा आपण दिलेली माहिती अपुरी असेल, तर तशी सूचना आपल्याला आयकर विभागातर्फे या नोटीसमार्फत पाठविली जाते. अशी नोटीस मिळाल्यास तिला पंधरा दिवसांच्या आत उत्तर देणे गरजेचे असते. ह्या नोटीसचे उत्तर, संबंधित कागदपत्रे व इतर माहितीसह ऑनलाईन पाठविता येते. जर सूचित वेळेआधी उत्तर पाठविले गेले नाही, तर आपण फाईल केलेला इन्कम टॅक्स रिटर्न रद्दबातल ठरू शकतो.

जर १३१(1 A) कलमान्वये पाठविलेली नोटीस, आपण आपले खरे इन्कम किंवा आर्थिक मिळकत उघड करीत नसल्याची शक्यता गृहीत धरून पाठविली जाते. या संदर्भात केल्या जाणाऱ्या चौकशीची सूचनाही या नोटीसमार्फत पाठविली जाते. ह्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी कोणतीही समयमर्यादा नसली, तरी सर्व बँक खात्यांची माहिती, किंवा इतर ठिकाणी आर्थिक गुंतवणुकी केल्या असल्यास त्याबद्दलची सर्व कागदपत्रे आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी हाताशी ठेवावी. १४२(1) कलमान्वये पाठविलेली नोटीस आयकर विभागाचे अधिकारी चौकशीस येण्याआधी, त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पाठविली जाते. जर आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर फाईल केलेला नसेल, तर आपल्याला ही नोटीस येऊ शकते. या संबंधातील सर्व कागदपत्रे आपण आयकर विभागाकडे पाठविणे गरजेचे आहे. जर आपण नियोजित वेळेआधी संबंधित कागदपत्रे आयकर विभागाकडे जमा केली नसतील तर त्यासंबंधी आणखी एक नोटीस आपल्याला १४३(२) या कलमान्वये पाठविली जाईल. या नोटीस ला उत्तर देणे गरजेचे आहे अथवा दंडात्मक कारवाई होऊ शकते.

१४३(1) कलमान्वये पाठविलेली नोटीस तीन प्रकारे पाठविली जाऊ शकते. सर्वप्रथम, आपल्याला आलेली ‘इंटीमेशन नोटीस’ आपण करादाखल भरलेली रक्कम योग्य असल्यासंबंधी असते. जर आपल्याला ‘रिफंड लेटर’ आले असले, तर आपल्याला जितका कर आकारला गेला आहे, त्यापेक्षा अधिक रक्कम आपण भरली आहे अशी माहिती आपल्याला या लेटर द्वारे दिली जाते. आपण जेवढी रक्कम अतिरिक्त भरली असेल, तेवढी रक्कम आपल्याला परत मिळण्याबाबतही या मध्ये माहिती असते. जर आपल्याला आयकर विभागातर्फे ‘डिमांड लेटर’ पाठविले गेले असेल, तर आपण करादाखल जमा केलेली रक्कम आपण भरावयाच्या निर्धारित रकमेपेक्षा कमी असल्याची सूचना या पत्राद्वारे दिली जाते. त्या सूचनेअनुसार बाकी असलेली रक्कम तीस दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक असते.

आयकर विभागाकडून सर्वसाधारणपणे या प्रकारच्या नोटीसा पाठविल्या जातात. त्यांनी गोंधळून न जाता आपली त्या संबंधातील सर्व कागदपत्रे पाठवून ठराविक वेळेआधी आयकर विभागाकडे पाठविल्यास पुढील त्रास टळू शकतो.

Leave a Comment