या देशातही साजरे होतात दिपोत्सव


दिव्यांच्या उत्सव दिवाळीची सुरवात भारतात झाली असून चार दिवस हा दिव्यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. घरेाघरी रांगोळ्या सजतील, आकाशकंदिल टांगले जातील, फराळाची रेलचेल असेल व नवीन कपडे, दागिने लेवून माणसे, मुले, महिला आनंदाने या सणात सहभागी होतील. यंदा कदाचित फटाके फुटणार नाहीत पण तरी सणाचा आनंद हरप्रकारे घेतला जाईल. भारताप्रमाणेच जगातील अन्य देशांतही दिपोत्सव साजरे होतात अर्थात त्यांची नांवे वेगळी असतात.


थायलंडमध्ये लाय क्रॅथोंग या नावाने साजरा होणारा दिपोत्सव दरवर्षी साजरा होतो. आपल्या दिवाळीप्रमाणेच तो ठराविक तिथीला साजरा केला जातो व त्यामुळे दरवर्षी तो वेगळ्या तारखांना येतो. शेवटच्या महिन्यातल्या पौर्णिमेला हा उत्सव केला जातो. यात केळ्याच्या पानात दिवे पेटवून ते पाण्यात सोडले जातात.


स्कॉटलंडमध्ये अपहॅली नावाने साजरा केला जाणारा उत्सव जानेवारीच्या शेवटच्या मंगळवारी साजरा होतो. हाही प्रकाशोत्सवच आहे व फार प्राचीन काळापासून तो साजरा होतो. रात्रीच्या वेळी लोक प्राचीन योद्धयांप्रमाणे पोशाख करून हातात मशाली धरून मिरवणुका काढतात, संपूर्ण शहर दिव्यांनी उजळलेले असते.


जपानमध्ये ओनियो नावाने साजरा होणारा उत्सव प्रकाशाचाच सण आहे. यात प्रामुख्याने अपघात,संकटांपासून मुक्ती मिळावी असा उद्देश असतो. त्याचे प्रतीक म्हणून सहा मोठ्या मशाली पेटविल्या जातात. मंदिरासमोर साधारणपणे या मशाली पेटवल्या जातात .


फ्लेारिडातील अल्टूना शहरात दरवर्षी ३१ आक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात हा उत्सव साजरा होतो. यात भूत आत्मे यांचा सन्मान केला जातो. लोक भूताप्रमाणे अथवा आत्म्यांप्रमाणे वेशभूषा करून मिरवणुका काढतात व बॉनफायर केला जातो. बाहेरूनही अनेक लोक मुद्दाम हा उत्सव पाहायला येतात.


कॅनडामध्ये ज्या दिवशी इंग्रज व आयरिश लोक येऊन त्यांनी वस्ती केली व कॅनडा स्थापन झाला तो दिवस कॅनडा फौंडेशन डे दिवाळीसारखाच साजरा होतो. न्यूफाऊंड लँड या नावाने ५ नोव्हेंबरला हा सण साजरा होतो. मोठ्या प्रमाणावर शोभेची दारू उडविली जाते. घरे रंगविली जातात बॉनफायर केला जातो.


इंग्लंडच्या डेवन येथील सेंट मेरी शहरात साजरा होणारा फायर फेस्टीव्हल देशभरात प्रसिद्ध आहे. ५ नोव्हेंबरच्या अर्ध्या रात्री हे शहर दिव्यांनी उजळून निघते. फटाके फुटतात व सर्व वयोगटातील लोक रस्त्यावर उतरतात. बॅरलमध्ये आग पेटवून ते बॅरल गर्दीतून नेले जाते. शहराच्या मध्यभागी बॉनफायर होतो.

Leave a Comment