एक डॉलरमध्ये खाण्यापिण्यासाठी कोठे काय मिळेल?


प्रवासाला निघायचे तर अगोदर राहण्याजेवणासाठी किती खर्च येणार याचा विचार करावा लागतो. अनेकदा आपल्याला किती पैशात कुठे काय मिळेल याची पुरेशी माहिती नसते व जेवणाखाण्यावरच बराच खर्च होतो व बजेट कोलमडते. आपण भारतात रूपया वापरतो तसेच परदेशात बहुतेक ठिकाणी अमेरिकन डॉलरच्या हिशोबाने तेथील स्थानिक चलन लक्षात घेतले जाते. भारतात डॉलरचा दर साधारण ६० ते ६५ रूपये धरला तर या किमतीत कुठल्या देशात काय मिळू शकेल हे पाहणे मनोरंजक आहे.

भारतात ६० ते ६५ रूपये खर्च केले तेही विशेषतः दक्षिणेकडे तर पोटभर इडली, वडा सांबार, डोसा अथवा रसम भात मिळू शकतो. पंजाबात एखादा मस्त पराठा मिळेल तर गुजराथेत ढोकळा फाफडा नक्कीच मिळेल. महाराष्ट्रात डाळ भात किंवा भाकरी मिळू शकेल.


या किंमतीत इटालीसारख्या देशात तुम्हाला फक्त १ कप कॉफी मिळू शकेल तर जपानमध्ये स्निकर मिळू शकते. उत्तर कोरियात या किमतीत १ बाटली दूध मिळेल तर रशियात दोन किलो बटाटे मिळतील.


इजिप्तमध्ये याच किंमतीत भारतातील खिचडीप्रमाणे बनविला जाणारा कोशारी पदार्थ मिळेल. हा तेथील पारंपारिक पदार्थ अ्रसून यात भात, काबुली चणे व मॅकरोनी घालून ही चटकदार डिश बनविली जाते. एक डीश पोटभर होते.१९ व्या शतकातील ही डीश तेथे खूपच लोकप्रिय आहे.


अमेरिकेत या किंमतीत पिझाचा एक तुकडा तुम्हाला मिळू शकेल तर झेक प्रजासत्ताक मध्ये १ ग्लास बियर मिळेल.इंग्लंडमध्ये याच किमतीत ब्रेड मिळू शकेल.


दुबईत याच किंमतीत तुम्हाला आपल्या पोळी रोलप्रमाणे शवर्ना नावाचा पदार्थ मिळेल. हाँगकाँगमध्ये या किमतीत कोक येईल.


नेपाळमध्ये ६० रूपयात तुम्हाला मस्तपैकी दहा मोमोज मिळतील आणि पोटभर खाण्याचा आनंदही.

Leave a Comment