निरनिराळ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून बिल न देताच पसार


रत्नागिरीचा रहिवासी असणाऱ्या शोएब मोडक या तरुणाने फसवाफसवीची अफलातून कल्पना शोधून काढली. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून तीनदा पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहून त्याने मनसोक्त आदरातिथ्य करवून घेतले आणि बिल न देताच पसार झाला. चौथ्या वेळी अजून एका पंचताराकित हॉटेल मध्ये राहण्यासाठी शोएब गेला खरा, पण तेथील आलिशान खोलीमधून त्याची रवानगी सरळ तुरुंगात करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी एका पंचतारांकित हॉटेल मध्ये राहण्यास शोएब गेला असता, हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला पैसे भरण्याद्बद्दल सांगितले. तेव्हा मोडक याने ३८,००० रुपये हॉटेलच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेल्याचा बनावट मोबाईल मेसेज कर्मचाऱ्यांना दाखविला. त्यांनी ही मोडकवर विश्वास ठेऊन त्याच्यासाठी एका आलिशान खोलीची तजवीज केली.

त्यांनतर तीन दिवसांनी मोडक याने आपल्याला अजून काही दिवस राहायचे असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यावर कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे अजून पैसे भरण्याबद्दल विचारण केली असता, आपले एटीएम कार्ड रूममधेच राहिले असून ते घेऊन येतो असे सांगून मोडक हॉटेलमधून पसार झाला. बराच वेळ झाल्यानंतरही जेव्हा मोडक परतला नाही तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय येऊन त्यांनी हॉटेलचे बँक खाते तपासले. तेव्हा हॉटेलच्या खात्यामध्ये शोएब याने कुठलीही रक्कम जमा केली नसल्याचे उघड झाले. मोडक जितके दिवस हॉटेल मध्ये राहिला, ते बिल साठ हजार रुपयांचे होते. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच संबंधित हॉटेलच्या मॅनेजरने इतर हॉटेल्सच्या व्यवस्थापनांस घडलेला प्रकार कळवून दक्ष राहण्याबद्दल सूचना दिली. आपले उद्योग सर्वच हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांना माहित असल्याबद्दल कोणतीच कल्पना नसलेला शोएब, आणखी एका पंचतारांकित हॉटेल मध्ये वास्तव्य करण्याच्या इराद्याने गेला असता, त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले आणि शोएबला कसलाही थांगपत्ता न लागू देता, पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर शोएबचे रवानगी हॉटेलच्या आलिशान खोलीमध्ये होण्याऐवजी पोलीस कोठडीत झाली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये, मोडक याने आणखी दोन हॉटेल्समध्ये ही बिल न भरता पसार झाल्याची कबुली दिली. पोलीसांनी शोएबवर फसवाफसवी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून, पंचतारांकित हॉटेल्स मधील उत्तमोत्तम पदार्थांवर ताव मारणारा शोएब सध्या मात्र तुरुंगाची हवा खात आहे.