आता चारा विकणार पतंजली


नवी दिल्ली – आता पशु चा-याच्या व्यवसायात बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली पदार्पण करणार आहे. पतंजलीने ही घोषणा मध्यमवर्गींयानंतर आता शेतक-यांवर लक्ष्य केंद्रित करत केली आहे. पतंजलीला चारा व्यवसायातील पदार्पणातच एक मोठी ऑर्डरदेखील मिळाली आहे. पशुखाद्याशी संबंधित पतंजली फोराजचे प्रमुख यशपाल आर्य यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही ऑर्डर देशातील सर्वात मोठी दुग्धजन्य उप्तादक कंपनी अमूलकडून मिळाल्याचे स्पष्ट केले.

पतंजलीकडून अमेरिकेहून आयात करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाद्वारे मक्याचा हिरवा चारा तयार करण्यात येणार आहे. गायीच्या दुधात या चा-यामुळे वाढ होणार असल्याचेही पतंजलीकडून सांगण्यात आले आहे. पतंजली यासाठी थेट शेतक-यांशी संपर्क साधत मका उत्पादनासाठी प्रेरित करणार आहे. हा मका नंतर चारा तसेच अन्य उपयोगासाठी पतंजलीकडून खरेदी करण्यात येईल.

पतंजलीच्या गुजरातमधील हिम्मतनगर प्रकल्पामधून १० हजार मेट्रिक टन चारा खरेदी करण्यासाठी अमूलने होकार दर्शविला आहे. यासाठी ६ कोटीं रुपयांची आगाऊ नोंदणीही अमूलने केली आहे. दुग्ध संकलक केंद्रांना हा चारा बाजारात मिळणा-या सुक्या चा-याच्या दरातच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पतंजलीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment