पहिले ऑटोमॅटिक स्मार्ट बाईकलॉक तयार


कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनीने जगातील पहिले पूर्ण ऑटोमॅटिक बाईक लॉक बिसिकू स्मार्टलॉक नावाने बाजारात सादर केले आहे. या लॉकमुळे सायकल आपोआप लॉक होते व अनलॉक होते.आजकाल जगभरात सायकल चालविण्याचे फॅड जोरात आहे मात्र अनेकदा पार्क केलेल्या सायकल चोरीला जातात त्यासाठी हे लॉक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ब्ल्यू टूथच्या माध्यमातून हे लॉक स्मार्टफोनशी कनेक्ट होते. रायडर सायकलपासून दूर गेला की ते आपोआप लागते व रायडर सायकल जवळ आला की आपोआप अनलॉक होते.

या कलुपासाठी एअरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम मेटलचा वापर केला गेला आहे. त्यामुळे ते वजनाला हलके पण मजबूत बनले आहे. हे लॉक कापून काढणे अशक्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. वॉटर रेझिस्टंट असल्याने ते पावसात वापरता येते. त्याला एलईडी लाईट दिले गेल्याने सायकल पार्क केल्यानंतर अंधारातही तिचा ठावठिकाणा समजू शकतो तसेच सायकल चालवित असताना दुसर्‍या वाहनांना या लाईटमुळे सायकलचे अस्तित्त्व जाणवते. ३५० ग्रॅम वजनाच्या या लॉकला अलार्मही आहे. सायकलला कुणी हात लावला तर अलार्म वाजतो तसेच त्याच थ्री मोशन सेन्सर्स असून ते सायकलचा वेग, सायकलने कापलेले अंतर समजण्यासाठी उपयुक्त ठरतात. या लॉकची बॅटरी यूएसबी केबलच्या सहाय्याने चार्ज करता येते व दोन तास चार्ज केली की सहा महिने पुन्हा चार्ज करावी लागत नाही.

Leave a Comment